मतदारांना कामाचा माणूस नको, राजू उंबरकर यांनी व्यक्त केली खंत

पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्यानेच निवडणुकीत पैसा चालला, उंबरकर कडाडले...

विवेक तोटेवार, वणी: आजवर मनसेचे काम पाहता या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होता. मात्र मतदारांनी माझ्या सर्व कामाला नाकारले. माझा पराभव झाला. यापेक्षा मोठं दु:ख म्हणजे मतदारांनी कामाच्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवलं. जर यावेळी मतदारांनी विश्वास टाकला असता तर मतदारसंघाचा कायापालट केला असता. जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णतः मान्य करतो. मात्र पराभव झाला तरी काम थांबणार नाही, असे वचन राजू उंबरकर यांनी दिले. शुक्रवारी राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जनतेच्या प्रश्नांसाठी हक्कासाठी मी कायम रस्त्यावर उतरलो, तुरुंगातही गेलो. अडीअडचणीत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेलो. हे सर्व वणीकर जनतेला माहिती आहे. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूक मनसे जोमाने लढणार, असेही ते म्हणाले. त्यांनी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व मनसे कार्यकर्ते, समर्थक  यांचे  देखील आभार मानले.

निवडणुकीत पैसा चालला
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा चालला. अलिकडच्या काळातील सर्वात जास्त पैशाचा महापूर या निवडणुकीत आला. मतदारसंघात राजरोसपणे पैसा चालला. मात्र याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले. पैसा चालण्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यांना याला आळा घालता आला असता. मात्र पोलीस प्रशासन निष्क्रिय राहिले. असा आरोप देखील राजू उंबरकर यांनी केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या पत्रकार परिषदेला मनसेचे मा. आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, महिला सेना जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, शुभम भोयर, संदिप वाघमारे, संतोष चिटलवार, सुमीत टुंड्रावार, मिथुन धोटे, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धीरज बगवा यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments are closed.