विवेक तोटेवार, वणी: नाष्टा करण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी जबर मारहाण केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. मारहाणीत रविनगर येथील रहिवासी असलेला तरुण जखमी झाला आहे. रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास टिळक चौक चौपाटी येथे ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी फिर्यादी तरुण तिथे नाष्टा करण्यासाठी गेला असताना त्याच्या अंगावर कढईतील तेल उडाले होते. या शुल्लक कारणातून दुस-या दिवशी वाद झाल्याची माहिती आहे.
तक्रारीनुसार, सचिन सुभाष सुर (37) हा रविनगर येथील रहिवासी असून तो ड्रायव्हिंग करतो. शनिवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास तो नाष्टा करण्याकरिता मुलांना घेऊन टिळक चौक चौपाटीवर गेला. एका टपरीवर नाष्टा करीत असताना त्यांच्या शर्टवर नाष्टाच्या गाडीवरील तळणीतील तेल उडले. यावेळी त्यांनी राजशेखर कुमार स्वामी गुंपला (45) याला याबाबत विचारणा केली. मात्र राजशेखरने सचिनशी वाद घातला व मारहाण करण्यास सुरुवात केली. सचिन घरी परतला.
दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी नाष्टा करण्यासाठी गेला. तिथे गेल्यावर राजशेखर याने आदल्या दिवशी झालेला वाद उकरून काढला. यावेळी राजशेखर याच्यासोबत रमेश कुंभारकर (45) व राजशेखरची मुलगी दिव्या राम कुंटावार (30) हे देखील मध्ये पडले. त्यांनी सचिनशी वाद घातला. वाद वाढत गेला. राजशेखर व रमेश याने ग्राहकाला बसण्यासाठी असलेल्या लोखंडी खुर्चीने सचिनला मारहाण केली. या मारहाणीत सचिन यांच्या उजव्या पायाला, कमरेला दुखापत झाली.
दिव्या हिने सिमेंटची विट सचिनच्या डोक्यावर मारली. रमेश याने हातात चाकू घेऊन धमकी दिली. या मारहाणीत सचिन यांना डोक्याला, डोळ्याला, उजव्या पायाला, कमरेला व दोन्ही हाताला मार लागला आहे. सचिनच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तिघांविरुद्ध कलम 118 (18), 352,351, (2), (3),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.