वणी विधानसभेतील निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या

डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी, संजय खाडेंसह 8 पदाधिकारी निलंबन प्रकरण

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे संजय खाडे यांनी बंडखोरी केली. त्यांना नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, शंकर व-हाटे, प्रशांत गोहोकार, पलाश बोढे, वंदना आवारी या 7 आजी-माजी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी मदत केली. या सर्व 8 पदाधिका-यांवर पक्षशिस्त भंगाची कार्यवाही करीत त्यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय खाडे यांच्यासह सर्व 8 पदाधिका-यांना पुन्हा पक्षात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, खासदार प्रतिभा धानोरकर व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

वणी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा कायमच बालेकिल्ला राहिला आहे. ही जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. निलंबित करण्यात आलेले सर्व पदाधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी त्यांचा वेळ काँग्रेस पक्ष संघटनेसाठी दिला आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष वाढवण्यासाठी आपला वेळ दिला. ते काँग्रेसशी कायम एकनिष्ट राहिले आहेत. त्यांच्यावर याआधी पक्षाबाबत शिस्तभंग केल्याचा ठपका नाही. त्यांनी केवळ काँग्रेसची हक्काची जागा शिवसेनेला सुटल्याच्या नैराश्यातून वेगळी भूमिका घेतली. असे निवेदनात म्हटले आहे.

बंडखोरीला वरोरा मतदारसंघातील बंडाचीही पार्श्वभूमी
वरोरा मतदारसंघात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असताना तिथे शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याने बंडखोरी केली. ही बंडखोरी रोखण्यासाठी संजय खाडे यांनी वणी मतदारसंघातून बंडखोरी केली, असे देखील बंडखोरीचे एक कारण मानले जाते. निवडणुकीनंतर वरोरा येथील बंडखोरी करणा-या उमेदवारावर शिवसेनेने कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट बंडखोरी करणा-या उमेदवाराला जिल्हाध्यक्ष पद देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले, हे विशेष.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पक्ष सध्या अडचणीच्या काळात – डॉ. महेंद्र लोढा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे पक्ष सध्या अडचणीतून जात आहे. पक्षाला पुन्हा उभारी देणे गरजेचे आहे. यासाठी पक्षाला सर्वांचीच मदत पाहिजे आहे. आगामी काळात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक देखील आहे. या निवडणुकीत पक्षाला यश मिळवणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष एकसंघ राहिला तर त्याचा पक्षाला फायदा होईल. निलंबनाची कार्यवाही मागे घेणे हा पक्षाला बळकटी देण्याचा एक मार्ग आहे.
– डॉ. महेंद्र लोढा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य काँग्रेस

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यातील एक गट हा संजय खाडे यांचा होता, तर दुसरा गट हा वामनराव कासावार यांचा होता. तिकीट वाटपाच्या वेळी काँग्रेसतर्फे संजय खाडे यांचे पारडे जड झाले. त्यामुळे कासावार यांनी ही जागा उबाठाला सोडली, असा एक मतप्रवाह आहे. मात्र ही जागा आधीच शिवसेनेच्या वाटेला गेली होती. तशी माहिती कासावार यांना त्यांच्या वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे कासावार यांनी पक्षादेश पाळत नमती भूमिका घेतली, असा देखील एक मतप्रवाह आहे. 

संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पहिल्यांदाच लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरताना दिसली. पक्षातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस वणी विधानसभा मतदारसंघात भूमिका बजावताना दिसला. मात्र काँग्रेसमधल्या अनेकांचा संजय खाडे यांच्या नावाला विरोध आहे. आता त्यांना व त्यांच्या सहका-यांना पुन्हा पक्षात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्याला विरोध होणार की सध्याची पक्षाची कठिण परिस्थिती पाहता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते एक होणार हे लवकरच स्पष्ट होईल. डॉ. महेंद्र लोढा यांच्या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Comments are closed.