विवेक तोटेवार, वणी: शहरातील जत्रा मैदान रोडवरील कत्तलखान्याजवळ शनिवारी संध्याकाळी शेकडो मृत गायीचे शीर आढळले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी कार्यवाही करीत रात्री उशिरा 7 तर रविवारी सकाळी एका संशयीतांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कत्तलखान्याजवळून व एका कार्यक्रम स्थळावरून मांसाचे सॅम्पल जप्त केले. ताब्यातील सर्व संशयीतांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आणखी काही आरोपी फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती होताच आ. संजय देरकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले. आज रविवारी रामनवमी उत्सव समितीने निवेदन देत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अशी झाली घटनेची उकल
वणीतील जत्रारोडवरील कत्तलखान्याजवळ विविध जनावरे कापले जातात. शनिवारी वणीतील एका घरी कार्यक्रम होता. या ठिकाणी गोमांस असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी घरी जाऊन मांसाचे सॅम्पल जप्त केले. दरम्यान पोलिसांना शहरातील एका लॉनमध्ये जेवण सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने या लॉनमध्ये जाऊन मांसाचे सॅम्पल जप्त केले आहे. हे सम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी कार्यवाही करीत शनिवारी रात्री उशिरा वणीतून 7 जणांना ताब्यात घेतले तर आज रविवारी सकाळी मारेगाव येऊन एकाला ताब्यात घेतले.
रामनवमी उत्सव समितीतर्फे निवेदन
घटनेची माहिती होताच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून याचा निषेध केला जात आहे. राम नवमी उत्सव समितीचे रवी बेलूरकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शासन कराने, अशी मागणी केली. रविवारी या प्रकरणी रामनवमी समितीतर्फे एसडीपीओ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कुंतलेश्वर तुरविले, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, बालाजी भेदोडकर, प्रवीण पाठक, नितीन भटगरे, प्रणित महाकुलकार, कमलेश त्रिवेदी, तुषार घाटोळे, विजय मेश्राम, पवन खंडाळकर, चैतन्य तुरविले, भारत रामगिरवार, निशिकांत देशपांडे, आकाश उईके, हर्षल बिडकर, अमर कनकुंटलवार, कुणाल कृष्णावार इत्यादींसह प्रभु श्रीराम नवमी उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
काय आहे ही घटना?
प्राप्त माहितीनुसार, वणीतील जत्रा मैदान रोड (कत्तलखानाजवळ) येथे मांस विक्रीचे दुकाने आहेत. शनिवारी दिनाक 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास चौपाटी बार समोर रस्त्याच्या कडेला ये-जा करणा-या काही तरुणांना दोन गायींचे शीर आढळून आले. हे तरुण या शिरासोबत सेल्फी घेत होते. दरम्यान तिथे जमलेली गर्दी व सेल्फी घेत असताना पाहून रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले.
काही वेळातच याचे व्हिडिओ याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. शिवसेना, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान वणी पोलिसांना देखील याची माहिती मिळाली. एचडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी जमा झाली होती.
शेकडो मृत गायींचे शीर आढळले
रस्त्यावर दोन गाईंचे गाईंचे शीर आढळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील जागेचा शोध घेतला. दरम्यान त्यांना एका झोपडीत शेकडो गाईंचे शीर आढळले. गायीचे शीर विकले जात नाही. त्यामुळे हे शीर एका झोपडीत ठेवल्याचा अंदाज बांधला जात आहे. या शिराचे एकाच वेळी विल्हेवाट लावली जाते. मात्र त्याआधीच याचा पर्दाफाश झाला आहे.
Comments are closed.