विवेक तोटेवार, वणी: उकणी येथे एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या वाघाचे वाघाचे नख व दात चोरीला गेले होते. या प्रकरणी वनविभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करीत 4 संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता यातील सतीश अशोक मांढरे (26), आकाश नागेश धानोरकर (27) दोघेही राहणार वणी यांना न्यायालनाने जामिन मंजूर केला. तर नागेश विठ्ठल हिरादेवे (27) व रोशन सुभाष देरकर (28) दोघेही राहणार उकणी ता. वणी यांना वनविभागाची कोठडी सुनावली होती. मात्र यातील नागेश विठ्ठल हिरादेवे याने वॉशरुममध्ये जाऊन गळ्यातील दुपट्ट्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार वनविभागाच्या कर्मचा-याच्या वेळीच लक्षात आल्याने त्याला लगेच फासातून सोडवण्यात आले. सुरुवातीला नागेशला वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थीर असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान वाघाचा पंजा (9 नखं) अद्याप गायब असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.
आरोपी सतीश अशोक मांढरे (26), आकाश नागेश धानोरकर (27) दोघेही राहणार वणी व नागेश विठ्ठल हिरादेवे (27) व रोशन सुभाष देरकर (28) दोघेही राहणार उकणी ता. वणी हे वेकोलिच्या उकणी खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. उकणी येथे दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी एक मृत वाघ कुजलेल्या आढळून आला होता. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना वाघाचे काही दात व वाघाचा पंजा गायब असल्याचे लक्षात आले. दात व पंजातील नखं शोधण्यासाठी अमरावतील, यवतमाळ, पांढरकवडा व वणी येथील वनविभागाची चमू कामी लागली होती. या प्रकरणी काही वेकोलि कर्मचा-यांची चौकशी करण्यात आली होती.
चौघेही आरोपी हे सुरक्षा रक्षक म्हणून वेकोलित काम करतात. त्यांना घटना उघडकीस येण्याच्या एक दोन दिवस आधी एक वाघ कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून दोघे जण घटनास्थळी गेले. त्यांनी वाघाचे नखं व दात कुतुहलापोटी काढून ठेवले होते. त्यानंतर दोघांनी हे दात व नखं त्यांचे कार्यालयीन सहकारी व मित्र असलेल्या इतर दोन आरोपींकडे दिले. मात्र चौकशी दरम्यान या घटनेचा पर्दाफाश झाला. अशी सूत्राने माहिती दिली आहे.
वाघाचा पंजा (9 नखं) अद्यापही गायब
16 जानेवारी रोजी वनविभागाने 4 दात व 3 नखं जप्त केले. आरोपी असलेल्या चौघांचाही कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. ते सराईतही नाही किंवा तस्करीच्या कामात प्रोफेशनल देखील नाही. त्यामुळे त्यांनी केवळ कुतुहलापोटी हे केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्यापही वाघाचा पंजा गायब आहे. या ठिकाणी आणखी दुसरे कुणी आले होते की ताब्यात घेतलेल्या आरोपींकडेच पंजा (9 नखं) आहे याचा वन विभाग शोध घेत आहे.
वनविभाग बाळगतोय कमालीची गोपनियता
या प्रकरणी वनविभाग कमालीची गोपनियता बाळगताना दिसून येत आहे. या कार्यवाहीची कोणतीही माहिती व अपडेट वनविभाग मीडियापासून लपवत होती. त्यातच एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे विविध शंकांना उधाण आले आहे. वनविभाग आरोपींना टॉर्चर तर करीत नाही, असा सवाल देखील या प्रकरणी उपस्थित होत आहे.
Comments are closed.