पळसोनी फाट्याजवळ ऑटोचा अपघात, महिला जागीच ठार

तिन्ही मुलामुलींचा आधार हरपला, मुलं झालीत पोरकी....

बहुगुणी डेस्क, वणी: ऑटोतून पडून एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दिनांक 19 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव असून त्या राजूर येथील रहिवासी होत्या. खच्चून प्रवासी भरल्याने रंजना या ऑटोतून खाली पडल्या असे बोलले जात आहे. या प्रकरणी आरोपी ऑटोचालक रहेमत रहिम खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. रंजना या त्यांच्या मुलांच्या एकमेव आधार होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलंमुली पोरके झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रंजना प्रवेश जंगमवार (अंदाजे 45) या राजूर (कॉलरी) येथील रहिवासी होत्या. त्या लालपुलिया परिसरातील एका कोलडेपो मध्ये मजुरी करायच्या. रविवारी सकाळी त्या कोलडेपोमध्ये कामाला गेल्या होत्या. संध्याकाळी काम संपवून त्या गावी परत जाण्यासाठी एका ऑटोत बसल्या. दरम्यान राजूर रोडवरील सोनामाता मंदिराजवळ ऑटोचालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. चालकाने करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे ऑटोत बसलेल्या रंजना खाली पडल्या.

त्या डोक्यावर पडल्या. यात त्यांच्या मेंदूला जबर इजा झाल्याचे बोलले जाते. त्यांना तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सदर ऑटोमध्ये अधिकचे प्रवासी होते. त्यामुळे त्या ऑटोतून खाली पडल्या, असे बोलले जात आहे. 

मुलं झालीत पोरकी…
रंजना यांच्या पतीचे काही वर्षांआधी निधन झाले होते. त्यांना दोन मुलं व एका मुली आहेत. पतीच्या निधनाच्या धक्यातून सावरत त्यांनी मुलांचे पालनपोषन करण्याचा निर्णय घेतला. काबाडकष्ट, मजुरी करून त्या आपल्या मुलांचे शिक्षण पाणी करीत होते. त्यांचे तिन्ही मुलंमुली शिकत आहेत. आई हेच या तिघा अपत्यांचा आधार होती. मात्र आईच्या मृत्यूमुळे त्यांचे मुलं पोरके झाले असून त्यांचा आधार हरपला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.