7 वर्षीय चिमुकल्या मनस्वीचे ठिकठिकाणी स्वागत व सत्कार

'स्केटिंग फॉर युवा' संदेश घेऊन मनस्वीची बोटोणी ते वणी स्केटिंग

विवेक तोटेवार, वणी: लोवेस्ट लिंबो स्केटिंग या प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेल्या मुळच्या बोटोणी येथील मनस्वी पिंपरे हिने सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने बोटोणी ते वणी असा 30 किलोमीटरचा स्केटिंगने प्रवास केला. यावेळी मार्गात ठिकठिकाणी तिचा विविध राजकीय पक्ष, संघटना व गावक-यांद्वारे सत्कार करण्यात आला.

मनस्वी विशाल स्नेहा पिंपरे ही सात वर्षांची चिमुकली मुळची बोटोणी येथील रहिवासी असून ती सध्या पुणे येथे स्थायिक आहे. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास बोटोणीहून स्केटिंग फॉर युवा हा संदेश घेऊन तिच्या स्केटिंगला सुरुवात झाली. सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास ती मारेगाव येथे पोहोचली. मारेगाव येथे विविध सामाजिक संघटना व पक्षाद्वारे तिचे स्वागत करण्यात आले. स. 9 वाजता तहसीलदार उत्तम निलावाड व ठाणेदार संजय सोळंखे यांनी तिच्या पुढच्या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर तिने वणीकडे प्रस्थान केले. दरम्यान ठिकठिकाणी गावात तिचे स्वागत व सत्कार करण्यात आला. स. 11.30 वाजता ती वणी येथे पोहोचली.

वणी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे), माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वतीने तिचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडून भव्य स्वागत समारोह घेण्यात आला. यावेळी तिचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी राजू उंबरकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लॉयंन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मनस्वीच्या स्वागत व सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

टूडे मेन्स वेयर यांच्याकडून मनस्वीला कपडे देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर विजय चोरडिया यांच्या तर्फे विनायक मंगल कार्यालय येथे मनस्वीचा स्वागत समारोह झाला. यावेळी मंचावर विजय चोरडिया, मनस्वीचे वडील विशाल पिंपळे, आई स्नेहा पिंपळे, प्रशिक्षक विजय मनजी, राजू धावंजेवार व पत्रकार उपस्थित होते. यावेळी तिच्या वडिलांनी मनस्वीने देशातील एखादे ऑलंपिक आणावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी विजय चोरडिया यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
मनस्वी ही सध्या पुणे येथे स्केटिंगचे धडे घेत आहे. वयाच्या साडे पाचव्या वर्षी तिने लिंबो स्केटिंग या प्रकरात अवघ्या 16.5 सेंटीमीटर उंचीच्या खालून 25 मीटर लांब स्केटिंग करीत ती सर्वात लहान स्केटिंग प्लेयर ठरली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील दखल घेत तिचे नाव नोंदवले होते. याआधी हा रेकॉर्ड एका 11 वर्षीय मुलीच्या नावे होता. यासह विविध राज्य व देशपातळीवरील स्केटिंग स्पर्धेत तिने विविध पदकं प्राप्त केली आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.