साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

बंद घर म्हणजे 100 टक्के घरफोडी, घरफोडी थांबवण्याचे ठाणेदारांपुढे आव्हान

निकेश जिलठे, वणी: शहरातील साधनकर वाडीत जबर घरफोडी झाली आहे. यात रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली. घरमालक बाहेरगाव गेल्यावर चोरट्याने ही घरफोडी केली आहे. बंद घर म्हणजे घरफोडी वणीत एक समीकरणच बनले आहे. ही वणीतील अलिकडच्या काळातील सर्वात जबरी घरफोडीपैकी एक घरफोडी असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही घरफोडीचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नुकतेच ठाणेदारांचा प्रभार घेतलेले ठाणेदार पीआय गोपाळ उंबरकर यांच्यापुढे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रदीप चिंडालिया हे एका विमा कंपनीचे सेवानिवृत्त डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांसह साधनकर वाडी येथे राहतात. दिनांक 25 जानेवारी रोजी ते कुटुंबीयांसह दक्षिण भारतात देवदर्शनाला गेले होते. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी केअर टेकर घरी आली असता तिला किचनचे दार उघडे दिसले. तिने जाऊन बघितले असता तिला घरफोडी झाल्याचे लक्षात आले. तिने याची माहिती घरमालकाला दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रदीप यांनी याची माहिती त्यांचा नागपूर येथे नोकरी करीत असलेल्या मुलगा याला दिली. तो घटनेची माहिती मिळताच नागपूरहून वणीला आला. घरी आला तेव्हा त्याला आलमारीचे दार उघडे दिसले. कपडे अस्तव्यस्त होते. तसेच कपाटातील सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम गायब असल्याचे कळले. चोरट्यांनी घराचे पुढच्या दाराची कुंडी कापून आत प्रवेश केला. कपाटाच्या चाव्या घरीच ठेऊन असल्याने त्यांना चाव्या शोधण्यास विलंब लागला नाही. त्यांनी चाव्या शोधून लोखंडी व लाकडी कपाटातून सोने, चांदी व नगदी असा एकूण 14 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलवले. या प्रकरणी प्रदीप यांचा मुलगा अक्षय यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 331 (3), (4), 305 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पथक व एलसीबीचे पथक या घटनेचा पाठपुरावा करीत आहे. परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींची मदत घेत तपास सुरु आहे.

चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान
बंद घर म्हणजे घरफोडी हे एक समीकरणच वणीत झाले आहे. वणीकर सातत्याने घरफोडीमुळे त्रस्त आहेत. चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही लावलेले दुकाने देखील सोडले नाहीत. तीन वर्षांपासून हे घरफोडीचे सत्र सुरु आहे. मात्र यातील एकाही घरफोडीचा पोलिसांना छडा लावता आला नाही. नुकतेच गोपाळ उंबरकर यांनी वणी ठाण्याचा प्रभार घेतला आहे. यांच्यापुढे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या आव्हान आहे. यात ते किती यशस्वी ठरतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.