निकेश जिलठे , वणी: वणीतील एसपीएम शाळेच्या बाजूला गोरक्षण रोडवर असलेली नगर पालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र. 3 चोरट्यांनी बुधवारी (गुरूवारी) मध्यरात्री फोडली. चोरट्यांनी शैक्षणिक साहित्य, खेळांचे साहित्य, सीसीटीव्हीचा डीव्हीआर व मॉनिटर तसेच विशेष म्हणजे चोरट्यांनी लायब्रेरीतील पुस्तकं लंपास केलीत. सुमारे 20 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. आधीच घरफोडीने वणीकर त्रस्त आहेत. त्यातच आता चोरट्यांनी शाळेकडे आपला मोर्चा वळवला आहे. आधीच्या कोणत्याही गुन्ह्याची उकल न होता घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे वणीतील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
शहरातील गोरक्षण रोडवर नगर पालिकेची शाळा क्र 3 आहे. सोयीसुविधांनी सुसज्ज अशी या शाळेची ओळख आहे. शाळेत सीसीटीव्ही, हायमास्ट लाईट तसेच सुसज्ज अशी लायब्रेरी देखील आहे. सध्या नगर पालिकेच्या शाळेच्या खेळांच्या स्पर्धा सुरू आहे. सकाळी मॅच असल्याने संघ घेऊन जाण्यासाठी शाळेतील शिक्षक शाळेत पोहचले असता त्यांना शाळेचे कार्यालय व वर्गाचे कुलूप तोडलेले आढळले. शिक्षकांनी आत प्रवेश केलै असता सर्व सामान अस्ताव्यस्त होते.
मध्यान्ह भोजनासाठी असलेली शेगडी, पेटीत ठेवलेले खेळांचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, वाचनालयातील रॅकमधली पुस्तकं चोरीला गेलेली आढळली. तसेच सीसीटीव्हीतून घटना उघडकीस येऊ नये म्हणून सीसीटीव्हीचा डीव्हीआर (हार्डडिस्क) व मॉनिटर चोरट्यांनी चोरून नेला. या चोरीत सुमारे 18-20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घटना उघडकीस येताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चोरट्यांनी निवांत मारला हात
चोरटे इतके निवांत होते की त्यांनी शाळेतील सर्व वर्गाला लावलेले व पेटीला लावलेले कुलूप फोडले. सुमारे 8 लॉक चोरट्यांनी फोडले. शाळेच्या आवारात बसवलेला हायमास्ट लाईट काढण्याचा प्रयत्न केला. लाईट तीन फूट खाली आणण्यात चोरट्यांना यश आले. मात्र लाईट खाली उतरवण्यास बराच वेळ लागत असल्याने चोरट्यांनी लाईट काढण्याचा प्रयत्न मध्येच सोडला.
घरफोडी रोखण्यात सर्व ठाणेदार अपयशी
गेल्या तीन वर्षात अनेक ठाणेदार आलेत. एक ठाणेदार तर केवळ चोरट्यांने घरमालकावर हल्ला केला म्हणून बदलून गेले. मात्र अद्याप एकाही ठाणेदाराला घरफोडीवर अंकुश बसवता आला नाही. विशेष म्हणजे शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र पोलिसांना चोरटे गवसत नाही व घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामु़ळे वणीकरांची परिस्थिती 3 इडीयट फेम ‘आल ईज वेल’ अशी झाली आहे. घरफोडी, चोरी सुरूच पण ऑल इज वेल..
Comments are closed.