विवेक तोटेवार, वणी: वेकोलि कर्मचारी असलेले गोपाळ भुसारी यांच्या वणी व सुंदरनगर येथील घरी चोरट्याने डाव साधला होता. एकाच व्यक्तीच्या घरी अवघ्या दोन महिन्यांच्या आतच चोरट्यांनी दुस-यांदा डल्ला मारला होता. त्यामुळे परिसरात याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या प्रकरणी एलसीबी पथकाने कारवाई करीत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे 10 लाखांचे सोने व मोबाईल जप्त केले.
काय आहे घटना?
गोपाळ बाळकृष्ण भुसारी हे सुंदरनगर येथील वेकोलिच्या क्वॉर्टरमध्ये राहतात. तसेच त्यांचे वणीतील जिल्हा परिषद कॉलनीतही घर आहे. जिल्हा परिषद कॉलोनीतील घरी त्यांची वृद्ध आई राहते. दिनांक 6 डिसेंबरच्या रात्री त्यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करीत 9 तोळे सोनं व 45 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. तर 3 फेब्रुवारी रोजी भरदिवसा त्यांच्या सुंदरनगर येथील कॉर्टर फोडून चोरट्यांनी लाखांचे 24 ग्रॅम सोनं व 40 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. एकाच व्यक्तीची दोन्ही घरं चोरट्यांनी फोडल्याने याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
संपूर्ण जिल्ह्यातच सातत्याने घरफोडी सुरु होती. त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशाने एलसीबी पथकाचे धनराज हाके व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही, सीडीआर तसेच इतर तांत्रिक मदत घेत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरटे हे अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यानुसार त्यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी अमरावती गाठत संशयीत आरोपी पंकज राजु गोंडाने (28) रा. चवरे नगर सुत गिरनी रोड अमरावती व सागर जनार्धन गोगटे (34) रा. गांधी चौक तुळजागीरवाला अमरावती (हल्ली मुक्काम यादगार नगर कारंजा, जि वाशिम) यांना अमरावती येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आधी तर त्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मात्र पुरावे सादर करून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दोन्ही घरफोडीच्या गुन्हयांची कबुली दिली. या दोघांकडून सुमारे 10 तोळे सोनं (119.1 ग्राम) सोन्याचे दागिने ज्याची किमत 10 लाख 36 हजार रुपये, 3 मोबाईल किंमत 21 हजार रुपये असा एकूण 10 लाख 57 हजार 344 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपीस पुढील तपासासाठी वणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
इतर घरफोडींचा छडा कधी लागणार?
वणीत बाहेरगावाहून चोरटे येऊन घरफोडी करीत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. लाल पुलिया येथील एका गोडावूनच्या चौकीदाराचा चोरट्यांनी खून देखील केला होता. सध्या दोन घटनेतील आरोपी गजाआड झाले आहेत. मात्र अद्याप अनेक घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागलेला नाही. त्यामुळे इतर घरफोडीच्या घटनेचा देखील छडा लागावा, अशी अपेक्षा वणीकर करीत आहे.
प्रकरणाचा तपास सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, सतिश चवरे पो.नि. स्था.गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. अजय वाळवे, पोलीस उपनिरिक्षक धनराज हाके, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, चालक नरेश राऊत इत्यादींनी पार पाडली.
Comments are closed.