पांढरदेवी मंदिरातील कार्यालय फोडले, 32 हजारांचा मुद्देमाल लंपास

देवळाच्या अंगणातला वाद पोलिसात, एका अध्यक्षांची दुस-या अध्यक्षाविरोधात तक्रार

बहुगुणी डेस्क, वणी: मंदिर किंवा कोणत्याही प्रार्थना स्थळ हे आत्मशांतीच सर्वोत्तम केंद्र असतं. तिथे गेल्यावर बाहेरचे तर सोडाच पण मनातल्या मनातली ही वाद सुटावेत अशी अपेक्षा असते. मात्र पांढरदेवी मंदिर परिसरात एक अजब घटना घडली. तिथल्या ट्रस्टच्या कार्यालयाचे लोखंडी शटर दुस-या ट्रस्टच्या अध्यक्षांनी फोडले, असा आरोप पहिल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी केला. शटर फोडून कार्यालयातील कपाट, खुर्ची व देणगीची रक्कम असा सुमारे 32,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, अशी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी एका ट्रस्टच्या अध्यक्षांच्या तक्रारीवरून दुस-या ट्रस्टच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नानाजी जागोजी परचाके (76) रा. आवळगाव ता. मारेगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. ते पांढरदेवी ट्रस्ट (क्र. 1) आवळगावचे अध्यक्ष आहेत. मारेगाव पासून 16 किमी अंतरावर पांढरदेवी हे देवस्थान आहे. हे देवस्थान चांगलेच प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरात ट्रस्टने सभा मंडपाच्या समोरील खुल्या जागेत तीन बाजूस लोखंडी शटर लावून त्यात कार्यालय तयार केले आहे. कार्यालयात ट्रस्टचे दस्तावेज तसेच इतर साहित्य आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नानाजी परचाके हे शनिवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान पांढरदेवी मंदिरात गेले होते. त्यावेळी त्यांना सभा मंडपाला लागलेले शटर व शटरचे रॉड तुटलेले आढळले. त्यांनी कार्यालयात जाऊन बघितले असता त्यांना तिथे ठेवलेले लोखंडी कपाट किंमत 7 हजार, 10 फायबर चेअर किंमत 4 हजार, टेबल किंमत 1500 रुपये, देणगी स्वरुपात मिळालेले 20 हजार रुपये तसेच संस्थेचे कागदपत्र चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी तातडीने याची माहिती गावातील पोलीस पाटील व सरपंचाला दिली. त्यांनी सदर माहिती मारेगाव पोलिसांना दिली.

दोन ट्रस्टमधला वाद आणि चोरी
या देवस्थानाबाबत दोन ट्रस्टमध्ये वाद सुरु आहे. एका ट्रस्टचे अध्यक्ष हे नानाजी परचाके आहेत तर दुस-या ट्रस्टचे अध्यक्ष विजय नामदेव गायकवाड (55) रा. कोठोडा ता. केळापूर हे आहे. पहिल्या ट्रस्टने मंदिर परिसरात कार्यालय सुरु केले. याला दुस-या ट्रस्टने विरोध केला होता. आठ दिवसाआधी दुस-या ट्रस्टचे अध्यक्ष विजय यांनी तुमच्या कार्यालयाचे शटर कापून फेकतो अशी धमकी दिली होती. त्यामुळे पहिल्या ट्रस्टने दुस-या ट्रस्टला चोरीसाठी जबाबदार धरले आहे.

फिर्यादी नानाजी परचाके यांनी ट्रस्टचे (क्र. 2) अध्यक्ष विजय नामदेव गायकवाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी विजय नामदेव गायकवाड यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 334 (1) व 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Breaking News – भरधाव ट्रॅक्टरची दोन ते तीन दुचाकींना धडक

Comments are closed.