बहुगुणी डेस्क, वणी: एका भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकीला धडक दिली. पळसोनी फाट्याजवळील राजूर रिंग रोडजवळ सोमवारी संध्याकाळी पावने आठ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर 2 जण जखमी झाले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी बाहेरगावी रेफर केल्याची माहिती आहे. भारत आवारी रा. वणी असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पंढरी भास्कर ढोके रा. बोर्डा व विपीन खैरे रा. मारेगाव असे जखमींचे नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास एक ट्रॅक्टर बेदरकारपणे भरधाव ट्रॅक्टर चालवत राजूरच्या दिशेने येत होता. राजूर रिंग रोडजवळ या ट्रॅक्टरने MH 34 BQ 2359 व MH29 AH 3864 सह आणखी एका दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात अपघातात दोन दुचाकीवरचे तिघे जण गंभीर जखमी झाले. तर तिस-या दुचाकीवरचा किरकोळ जखमी झाला.
वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू
गंभीर जखमी पैकी भारत हरी आवारी (45) रा. जिल्हा परिषद कॉलोनी वणी हे मुळचे आरवट ता. जि. चंद्रपूर येथील रहिवासी होते. भांदेवाडा येथील वेकोलि खाणीत ते नोकरीला होते. ते त्यांची मोटर सायकल (MH34BQ 2359) ने वणीहून भांदेवाड्याला ड्युटीला जायचे.सोमवारी ते नेहमीप्रमाणे त्यांची शिफ्ट संपल्यानंतर वणीला परत येत होते. दरम्यान परतताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
इतर दोन जखमी पंढरी भास्कर ढोके रा. बोर्डा व विपीन खैरे रा. मारेगाव असे असून पंढरी ढोके याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बाहेरगावी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला उपस्थित नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचे कळते. ट्रॅक्टर चालक हा मद्याच्या नशेत होता असे प्रत्यक्षदर्शी बोलत आहे. सदर ट्रॅक्टर राजूर येथील असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात बीएनएसच्या कलम 281, 125 (A), 125(B), 106(1) व मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (A), 134 (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढरदेवी मंदिरातील कार्यालय फोडले, 32 हजारांचा मुद्देमाल लंपास
Comments are closed.