बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा काळ विद्यार्थ्यांसाठी धकाधकीचा झाला आहे. शाळा, कॉलेजेस, स्पेशल क्लासेस यात ते व्यस्त असतात. त्यांच्या घरी येण्याजाण्याच्या वेळेचे नियोजनही मोडकळीस येते. क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली अशीच एक ११ व्या वर्गातली मुलगी घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी (16) ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती मारेगावातील एका महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिकते. ती कम्प्युटरचे क्लासदेखील करीत आहे. शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास ती घोन्सा रोडवरील एका कॉम्प्युटर क्लासला जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र संध्याकाळी झाली तरी ती घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिचे वडील अस्वस्थ झालेत. त्यांनी मुलगी घरी आली नाही म्हणून मुलीचे पालक घोन्सा रोडवर गेलेत. मात्र त्यांना या रोडवर कोणताही कॉम्प्युटर क्लास नसल्याचे कळले.
मुलीच्या पालकांनी तिच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर मुलगी दिशाभूल करून घरून निघून गेल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
Comments are closed.