मुकुटबन येथील सिमेंट कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

कंपनीच्या प्रदूषणाचा शेतीवर परिणाम, नुकसान भरपाईची मागणी

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला या सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा शेतपिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याविरोधात शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उचलले असून कंपनीने तात्काळ नुकसान नुकसान भरपाई द्यावी अशी शेतक-यांनी मागणी केली आहे. परिसरातील 18 शेतकरी दिनांक 20 फेब्रुवारी पासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा 6 वा दिवस होता. मात्र कंपनीतर्फे अद्यापही कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

गेल्या 8 ते 9 वर्षापासून आरसीसीपील अँड एम पी बिरला या कंपनीचा मुकुटबन येथे सिमेंट उद्योग आहे. या कंपनीतून निघणाऱ्या केमिकल युक्त धुरामुळे कंपनी लगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी कंपनीचे शाखा व्यवस्थापक यांना तोंडी व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले होते. मात्र मुजोर कंपनी प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखवली, असा शेतक-यांचा आरोप आहे. अखेर 18 शेतकऱ्यांनी 20 फेब्रुवारी पासून कंपनीच्या गेट क्रमांक 4 समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शासनाकडून शेतकऱ्यांना एकरी 13 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या परिसरात खरीप,रब्बी व उन्हाळी असे तीन पिके घेण्यात येते. त्यामुळे कंपनीने तिन्ही पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. याबाबत आमदार संजय देरकर यांना देखील निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले असा शेतक-यांचा आरोप आहे. तसेच त्यांनी अद्यापही शेतक-यांची भेट घेतली नसल्याने शेतक-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

आज मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपोषण मंडपाला भेट देत शेतक-यांशी चर्चा केली. जोपर्यंत कंपनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी गजानन बरशेट्टीवर यांनी दिली.

Comments are closed.