निकेश जिलठे, वणी: 251 किलोचा त्रिशूल (बाण) शिव भक्तांनी डोक्यावर घेत वणीहून शिरपूरकडे प्रस्थान केले. भाविकांच्या भक्ती आणि उत्साहाला उधाण आलेलं होतं. जातो गा महादेवा, एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेवचा घोष करीत भक्तांनी 14 किलोमीटरचे अंतर पायीच तुडवले. निमित्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी निघालेल्या भव्य त्रिशूळ यात्रेचे. शिरपूर येथील शिव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी वणीहून बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी भाविकांची भव्य पदयात्रा निघाली. या त्रिशूळ यात्रेमध्ये वणी व परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.
वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली. सकाळी 10 वाजता बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. उडता त्रिशूळ व शिवतांडव नृत्य हे पदयात्रेचे प्रमुख आकर्षण होते. स्थानिक कलावंतांनी देखील पदयात्रेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या पदयात्रेत जैन ले- आऊट, आंबेडकर चौक, गणेशपूर, सेवानगर, रंगारीपुरा, प्रगती नगर, गोकुळनगर यासह शहरातील हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. यात महिला भाविकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदारांसह मान्यवरांनी दिली भेट
टिळक चौकात आमदार संजय देरकर, संजय खाडे तसेच मान्यवरांनी यात्रेला भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथस्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी, मंदर असा मार्गक्रमण करीत यात्रा शिरपूर पर्यंत पोहचली. दरम्यान वाटेत असणा-या विविध गावातील भाविक या यात्रेत सहभागी झालेत. महादेवाचा जयघोष व महादेवाची गाणी यांनी यात्रेत भाविकांमध्ये उत्साह भरला. शिरपूर जवळ केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सर्व भाविकांची भेट घेत ते देखील या यात्रेत सहभागी झाले.
या यात्रेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रशांत भालेराव, अनिल अक्केवार, नीलेश परगंटीवार, गजानन कासावार, निखिल खाडे, मंगेश झाडे, सारंग बिहारी, शरद ढुमणे, सुरेश आवारी, संतोष लक्षेटीवार, काकडे गुरुजी यांच्यासह आयोजन समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.
Comments are closed.