बहुगुणी डेस्क, वणी: सायकलची हवा सोडल्याच्या शुल्लक कारणावरून दोन शेजा-यांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद पुढे झिंज्या पकडून मारहाण करण्यापर्यंत पोहोचला. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक पुरुष व 3 महिलांचा समावेश आहेत. मारेगाव येथील नगर पालिकेच्या मैदानावर मंगळवारी संध्याकाळी ही मारहाण झाली.
तक्रारीनुसार, फिर्यादी (40) हा मारेगाव येथील वार्ड क्रमांक 14 येथील रहिवासी असून तो शेती करतो. मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. दरम्यान त्यांच्या घरा शेजारी राहणा-या मुलाने फिर्यादीच्या मुलाच्या सायकलची हवा सोडली. त्यामुळे फिर्यादीचा मुलगा हवा सोडणा-या मुलाला सायकलची हवा का सोडली याबाबत विचारणा करायला गेला. यावेळी फिर्यादीची मुलगी देखील त्याच्या भावाच्या सोबत होती. मात्र हा वाद वाढतच गेला. फिर्यादीच्या मुलगा व मुलीचा त्यांच्या शेजा-याशी चांगलाच वाद झाला. शेजा-याने फिर्यादीच्या मुलामुलीला दमदाटी केली.
फिर्यादीचा मुलगा व मुलगी घरी आले. त्यांनी वडिलांना कॉल करून या वादाबाबत माहिती दिली. एका तासाने फिर्यादी हा शेतातून घरी आला. त्याने नगरपालिकेच्या सार्वजिनक मैदानावर जात मी घरी नसताना माझ्या मुलांना दमदाटी का केली अशी विचारणा शेजा-यांना केली. मात्र शेजारी त्याच्या अंगावर धावून आले. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश होता.
त्यांनी फिर्यादीला थापड व बुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या कानाच्या वर दुखापत झाली. वडिलांना मारहाण होताना पाहून फिर्यादीची मुलगीमध्ये आली. तिला एका महिला शेजा-याने केस धरून ओढले व चापटा मारणे सुरु केल्या. त्यानंतर शेजारी पुरुषाने तिला अश्लिल शिविगाळ करीत तिला धमकी दिली. फिर्यादीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरोधात बीएनएसच्या कलम 115(2), 296, 3, 351 (2), 351 (3) व 5 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.