बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीवर एका 15 वर्षीय मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मारेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी 15 वर्षीय विधीसंघर्ष (अल्पवयीन) मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पीडिता ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिचे आई वडील मजुरी करतात. आईवडील कामावर गेल्यावर ती आजी सोबत घरी असते. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास चिमुकली घराबाहेर खेळत होती. तेव्हा गावातीलच एका आठव्या वर्गात शिकणा-या मुलाची तिच्यावर वाईट नजर गेली. त्याने तिला गोठ्यात नेले. तिथे तो तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू लागला.
दरम्यान पीडितेचे आईवडील घरी आले. मात्र त्यांना त्याची मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी घराजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संशयीत मुलगा हा गोठ्यातून बाहेर आला व तिथून तडक निघून गेला. पीडितेच्या वडिलांनी गोठ्यात प्रवेश केला असता त्यांना गोठ्यात त्यांची मुलगी आढळली. वडिलांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर तिने झालेला प्रकार वडिलांजवळ कथन केला.
हादरलेल्या मुलीच्या वडिलांनी तातडीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी विधी संघर्ष बालकास बीएनएसच्या कलम 65(2), 64(2), व बाल लैंगिक संरक्षण अधिनियम कलम (पोक्सोच्या) 3 (ब) 4, 5 (म), 6 नुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Comments are closed.