जातीवाचक शिविगाळ केल्याने ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
इंदिरा चौकातील घटना, जातीवाचक शिवी देणे भोवले
बहुगुणी डेस्क, वणी: जातीवाचक शिविगाळ केल्यामुळे एकावर ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीतील इंदिरा चौकात ही घटना घडली. संग्राम बाजीराव गेडाम (26) असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून वार्डातच राहत असलेल्या त्याच्या शेजा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम हा इंदिरा चौक वणी येथे राहतो. तो मजुरी करतो. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी तो कामाहून घरी परत आला. तो घरासमोर खुर्ची टाकून आराम करीत बसला होता. याच वार्डात आरोपी विशाल बाबाराव खांदनकर (44) राहतो. दुपारी 3 वाजताच्या सुमारास विशाल हा संग्राम जवळ आला. तिथे त्याने संग्रामला तू इथे खुर्ची टाकून कसा बसला अशी विचारणा करीत त्याला जातीवाचक शिविगाळ केली. घटना घडली त्यावेळी तिथे काही शेजारी उपस्थित होते.
जातीवाचक शिविगाळीमुळे संग्रामने पोलीस स्टेशन गाठत विशाल विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी सर्व अंगाने चौकशी करून आरोपी विशाल विरोधात ऍट्रोसिटीच्या कलम 3(1)(r), 3(1)(s) व बीएनएसच्या कलम 296 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.