कायदा व सुव्यवस्था सांभाळताना राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणी: बाळासाहेब खाडे

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: कायदा व सुव्यवस्था सांभाळताना वणी पोलीस कर्तव्याचे पालन करीत असतात. परंतु कधीकधी राजकीय हस्तक्षेपामुळे यात अडचणी निर्माण होत असल्याची प्रकट कबुली वणीचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. ‘मीट द प्रेस’ या शनिवारी सायंकाळी वणीच्या नगर वाचनालयात प्रेस वेलफेअर असोसिएशन वणी द्वारा आयोजित कार्यक्रमात निमंत्रित पत्रकारांची दिलखुलास गप्पा मारताना ते बोलत होते.

कायदा व सुव्यवस्था राबवताना होणा-या राजकीय हस्तक्षेपाबद्दल बाळासाहेब खाडे यांनी विविध उदारहणं देऊन आपली याबाबतची खंत व नाराजी व्यक्त केली. हा मुद्दा स्पष्ट करताना पुढे ते म्हणाले की मुंबईमध्ये काम करीत असताना राजकीय हस्तक्षेप बहुदा नसतोच त्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राबवताना पोलीस निर्भीडपणे कर्तव्य बजावतात. परंतु वणीमध्ये राजकीय दबाव नसला तरी राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीसारखे विषय हाताळतानासुद्धा पोलिसांपुढे अडचणी निर्माण होतात. राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून याबाबत येणारे कॉल ही आता नित्याचीच बाब झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

अवैध धंदे खुलेपणेने सुरू असल्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसोबतच सामाजिक
विश्लेषणाचीही गरज त्यांनी बोलून दाखवली. अतिक्रमणासारख्या संवेदनशील विषयावर बोलताना ते म्हणाले की नगर पालिकेला आमचे
नेहमी याबाबत सहकार्य असते आणि याबाबतचा पुढाकार नगर पालिकेने घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार बाहतुकीस
अडथळा निर्माण होते. या एका कारणावरून पोलीस काही मर्यादेपर्यंत अतिक्रमणावर कार्यवाही करू शकतात. असे ही ते पुढे म्हणाले.

शिवाजी चौक सारख्या अतिशय वरदळ असणा-या भागामध्ये रस्त्यावर जाहीर कार्यक्रम घेण्याबाबत सुद्धा बाळासाहेब खाडे यांनी नाराजी
व्यक्त केली. याबाबत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा ठिकाणी कार्यक्रम घेणे ही परंपरा
असल्याचे सांगण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

वेकोली व रेल्वे सायडींगमधून होणा-या खुलेआम कोळसा चोरीबाबत त्यांनी वेकोली प्रशासनाला तेवढेच जबाबदार धरले. वेकोली
प्रशासनाजवळ स्वतःची सुरक्षा व्यवस्था असताना कोळसा चोरी होतोच कसा होऊ असाही खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेकोली
कोळसा चोरी प्रकरणी सहसा फिर्याद दाखल करीत नाही. ती बाबसुद्धा यावेळी त्यांनी उघड केली.

वणीच्या सांस्कृतिक व सामाजिक पर्यावरणाविषयी त्यांनी प्रश्न विचारला असता. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना वणीकरांचे तोंडभरून कौतुक केले. वणीसारखा धार्मिक व सामाजिक एकोपा आणि सलोखा वाख्याण्यासारखी बाब असल्याची पावती त्यांनी दिली. हा एकोपा आणि सलोखा असाच जतन करावा अशीही सार्थ अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वणीचे पोलीस स्टेशनचे कार्यालय आणि पोलिसांचे निवासस्थान असलेली वसाहत याविषयीच्या दैन्यावस्थेबाबत बोलताना मात्र ते कमालीचे भावूक झाले होते. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या पोलीस स्टेशनची आणि निवासी वसाहतीची दुरवस्था याबाबत पत्रकारांनीसुद्धा पाठपुरावा करावा अशीही विनंतीवजा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच एका दिवसाच्या बाळाचं आणि त्याच्या आईचं पूनर्मिलन नाट्यमय घडामोडीनंतर आपण करू शकलो. हा आपल्यासाठी सदैव कर्तव्यपूर्तीचा आनंदठेवा आहे. अपहरण झालेलं बाळ आईच्या कुशीत आपण सुखरुप पोचवल्याचं कौतुक पोलीस अधिक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांनी केल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.

मीट द प्रेस या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार यांनी तर संचालन विनोद ताजने यांनी केले. उपस्थित पत्रकारांचे आभार असोसिएशनचे सचीव रमेश तांबे यांनी मांडले. यावेळी मोठ्या संख्येने वणीतील पत्रकार उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.