बहुगुणी डेस्क, वणी: एका कुमारिकेला नात्यातीलच एका मुलाने फूस लावून पळवून नेले. तसेच तिच्यासोबत लग्न ही केले. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. मुलीने लग्न केल्यावर त्याचे फोटो एका नातेवाईकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. त्यावरून मुलीने लग्न केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पळवून नेणा-या मुलाविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी (वय 17 वर्ष 6 महिने) ही मारेगाव तालुक्यातील रहिवासी असून ती 12 व्या वर्गात आहे. ती तिच्या भावासह राहते. 12 वीचा पेपर झाल्यानंतर ती आजीच्या गावाला गेली होती. शुक्रवारी दिनांक 28 मार्च रोजी ती घरी परत आली होती. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर भाऊ झोपला होता. दरम्यान रात्री भाऊ झोपल्यावर मुलगी घरून निघून गेली.
शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जेव्हा मुलीचा भाऊ जागा झाला, तेव्हा त्याला घरी त्याची बहिण आढळली नाही. त्यांनी आधी शेजा-यांकडे शोध घेतला. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान त्यांनी मावशीच्या मुलाला फोन केला असता मुलीने त्याला लग्नाचे फोटो मोबाईलवर पाठवल्याची माहिती दिली. त्याने सदर फोटो मुलीच्या भावाला पाठवले.
मुलीने नात्यातीलच एका मुलाशी लग्न केले होते. मुलगी सज्ञान नसल्याने मुलीच्या भावाने तातडीने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत मुलावर (वय 22) लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.