वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…
जत्रा व बैलबाजाराला मोठा फटका, अनेक कार्यालयाचे कॅबिन फुटले
निकेश जिलठे, वणी: गेल्या अनेक दशकांतील एका भयंकर वादळाला वणीकरांना तोंड द्यावं लागलं. शुक्रवारी संध्याकाळी वणी व परिसरात सुमारे एक तास हे वादळ घोंघावलं. या वादळात अनेक झाडं कोसळलीत. घरावरचे टिनपत्रे उडाली. उडालेल्या टिनपत्र्यांमुळे अनेकांचा थोडक्यात जीव वाचला. तर जत्रा मैदानात सुरु असलेल्या जत्रेला व बैलबाजाराला याचा चांगलाच फटका बसला. वादळामुळे अनेक टेन्टचे मोठे नुकसान झाले. वणी शहरासह काही भागात हे वादळ होते. या वादळाचा फळबागांना चांगलाच फटका बसला. मंदर येथील आमराईचे मोठे नुकसान यात झाले आहे. दरम्यान वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने वणीकरांच्या समस्येत आणखीनच भर टाकली. संध्याकाळी गेलेली पहाटेच्या सुमारास आली. गेल्या अनेक दशकांतील एका भयंकर वादळापैकी हे एक वादळ होतं. असे बोलले जात आहे.
शुकवारी दिनांक 18 एप्रिलची संध्याकाळी वणीकर व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत भयभीत करणारी होती. दुपारी वणी शहरात कडक उन्ह होते. मात्र संध्याकाळची चाहूल लागताच आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली. त्यानंतर आकाशात वादळ घोंगावू लागले. या वादळाचा वेग इतका जास्त होता की वादळामुळे नागरिकांचा चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे पाऊन ते 1 तास हे वादळ सुरु होते. त्यानंतर वादळी वा-यासह पाऊस सुरु झाला.
वादळाचा कहर, अनेकांचे नुकसान
वादळी वा-यामुळे वणीतील काही परिसरातील घरांवरचे टिनपत्रे उडाले. फुटपाथवर असलेल्या व्यावसायिकांचे साहित्य उडाले. काही कवेलुंच्या घरातील कवेलूंची नासधूस झाली. वादळाचा वेग इतका भयंकर होता की काही ऑफिसच्या कॅबिनच्या काचा देखील वादळामुळे फुटल्याची माहिती आहे. वणी शहरालगत असलेल्या शेतातील गोठ्यातील टिन उडाले. यासह अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. काही फांद्या व झाड ईलेक्ट्रीक पोलवर पडले. रस्त्यावरील लावलेले अनेक झाडं कोसळलेत.
फुटपाथ व्यावसायिक व धाबा व्यावसायिकांचे देखील या वादळात चांगलेच नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शहरात सुरु असलेल्या जत्रा व बैलबाजाराला वादळाचा चांगलाच फटका बसला. काही टेन्ट उडाले तर काही टेन्टचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर वादळाचा फळबागांना मोठा फटका बसला आहे. विशेष करून आंबा व लिंबू व्यावसायिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. मंदर येथील आमराईचे वादळामुळे चांगलेच नुकसान झाल्याची माहिती आहे. काही ठिकाणी घरासमोर लिंबाचा सडा पडलेला आढळला.

थरार… 30 वर्षात असे वादळ बघितले नाही !
वादळाचा तडाखा इतका होता की वादळाने टिनपत्रे, झाडांच्या फांद्या तसेच अनेक वस्तू आपल्या कवेत घेतल्या. याचवेळी चारगाव चौकी जवळ काही दुचाकीस्वार वणीच्या दिशेने येत होते. वादळापासून वाचण्यासाठी या दुचाकीस्वारांनी ट्रकखाली आसरा घेतला. अनेक टिनपत्रे उडताना त्यांनी बघितले. तसेच त्यांच्या डोळ्या देखत पेट्रोल पम्पच्या कार्यालयाच्या कॅबिनची काच फुटली. तर चारगाव चौकीवरील दुस-या पेट्रोल पम्पच्या कार्यालयावर झाड कोसळले. हे वादळ इतके भयंकर होते की रस्त्याच्या कडेला जर आसरा घेण्यास ट्रक नसते, तर कदाचित जीव गेला असता, गेल्या 30 वर्षात इतके भयंकर वादळ कधीच बघितले नाही, अशी आपबिती दुचाकी स्वारांनी ‘वणी बहुगुणी’जवळ सांगितली.
संध्याकाळी लाईट गुल, वणी अंधारात
वादळी वा-यामुळे इलेक्ट्रीक पोलवर फांद्या व झाड कोसळले. त्यामुळे अनेक ईलेक्ट्रीक पोल वाकलेत. तर काही सिमेंटचे पोल तळातून तुटले. याचा ईलेक्ट्रीक सप्लायवर परिणाम झाला. वातावरणात आधीच चांगलाच उकाडा होता. त्यातच लाईट गेल्यामुळे वणीकरांना उकाड्यातच रात्र काढावी लागली. शहरातील लाईट पहाटे 3 वाजताच्या सुमारास आली. मात्र काही ग्रामीण भागातील लाईट अद्यापही गुल असल्याची माहिती आहे.
या वादळात किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र अलिकडच्या काळातील हे सर्वाधिक नुकसान असल्याचे बोलले जात आहे. लवकरच या नुकसानीचा पंचनामा होणार आहे. (पाहा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडीओ… व्हिडीओ कर्टसी वणीकर झोन इन्ट्राग्राम पेज)
Comments are closed.