बहुगुणी डेस्क, वणी: पतीने गर्भवती असलेल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. तिला मदत म्हणून पुतणीलाही सोबत राहण्यास सांगितले. मात्र काकूच्या मदतीला आलेल्या कुमारिकेला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. मारेगाव तालुक्यातील एका गावात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पळवून नेल्याचा संशय असलेल्या आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी रमेश (नाव बदललेले) हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची सासुरवाडी मारेगाव तालुक्यात आहे. त्यांची पुतणी (16) ही बालपणापासून त्यांच्यासोबतच राहते. रमेशच्या पत्नीची डिलेव्हरी असल्याने रमेशने पत्नीला मारेगाव तालुक्यात आणून सोडले होते. पत्नीला मदत होईल म्हणून त्यांनी पुतणीलाही गावी आणले. गेल्या दोन महिन्यापासून रमेशची पत्नी व पुतणी गावीच राहत आहे. बुधवारी दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी रमेश हे सासुरवाडीला पोहोचले. ते पत्नीला घेऊन एका डॉक्टरकडे गेले. तेव्हा त्याची पुतणी घरी एकटीच होती.
संध्याकाळी दवाखाना करून रमेश पत्नीसह घरी परतले. तेव्हा त्यांना त्यांची पुतणी घरी दिसली नाही. त्यांनी त्यांच्या सासू सास-यांना याबाबत विचारले. मात्र त्यांनी गावातील एका नातेवाईकाकडे कार्यक्रम आहे, तिथे ती गेली असावी असे सांगितले. रमेश पुतणीचा शोध घेत कार्यक्रमात गेले. मात्र त्यांना तिथे ती दिसली नाही. घरी परतल्यावर त्यांनी शेजारी चौकशी केली केली. तेव्हा त्यांना एका शेजा-याने ती दुपारी गावातील एका तरुणाच्या दुचाकीवर बसून कुठेतरी जाताना दिसली, असे सांगितले.
रमेशने त्या तरुणाला (20) कॉल केला. मात्र त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ होता. अखेर पुतणीला तरुणाने फूस लावून पळवून नेण्याची खात्री पटताच त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.