नगर परिषद शाळा क्र. 8 द्वारा जलदिंडीचे आयोजन
देवेंद्र खरवडे, वणी: असे म्हणतात की जल है तो कल है. पाण्याची भीषण टंचाई सर्वत्र सध्या जाणवू लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वापर करणे गरजेचे आहे. जनतेला पाण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे व पाण्याचा अपव्यय टाळणे या उद्देशाने नगर परिषद वणी अंतर्गत सर्व शाळांमध्ये दि 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान जलसप्ताह साजरा होत आहे. या जलसप्ताहा निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी द्वारा मंगळवारी जलदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्य व पत्रका द्वारे पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला.
सकाळी 9.30 वाजता ही जलदिंडी शाळा क्रमांक 8 मधून निघाली. सेवानगर, रंगारीपुरा या परिसरात ही जलदिंडी फिरली. चिमुकल्यांनी ‘जल है तो कल है’, ‘बुंद बुंद किमती है, जल है तो जीवन है’ असे नारे लावत जलसाक्षरतेचा संदेश दिला. या जलदिंडीत शाळा क्रमांक 8 चे सुमारे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. जलदिंडी नंतर वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जल हेच जीवन यावर आपले मत प्रकट केले. मुख्याध्यापक बंडूजी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वापर करण्याचे सांगितले.
नगर परिषद अंतर्गत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. जलसप्ताहा निमित्त सर्व वणीकर जनतेने पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वापर करावा व नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मुख्याधिकारी संदिप बोरकर शिक्षण सभापती आरतीताई वांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…