विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्ता ओलांडणा-या एका तरुणीला जबर धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली. रविवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळ ही घटना घडली. निकिता दत्तू वालकोंडे (26) रा. जैताई नगर असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
निकिता ही जैताई नगर येथील रहिवासी आहे. ती रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास दूध आणण्यासाठी बसस्थानका समोरील एका दुकानात जात होती. रस्ता ओलांडताना तिला एका कारने जबर धडक दिली. या धडकेत तिच्या जबड्याला, डोक्याला, हाताला व पायाला मार लागला. तसेच तिचे समोरचे काही दात तुटले. अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
अपघात होताच तिथे लोकांची गर्दी जमा झाली. लोकांनी अपघाताची माहिती निकिताच्या कुटुंबीयांना दिली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. निकिताच्या भावाने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम 281,125 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहायक फौजदार सुरेंद्र टोंगे करीत आहे.
Comments are closed.