दूर व्हा नाहीतर मरतेच, मुलीच्या उत्तरानं बापालाच पेच

कोवळ्या वयातल्या आंधळ्या प्रेमानं कुटुंब पडलं संकटात

बहुगुणी डेस्क, वणी: ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणतात. ‘ती’ तर त्याहीपेक्षा कमी म्हणजेच 14च वर्षांची आहे. तिचा नजिककच्या एका गावातील युवकावर जीव जडला. प्रेमाच्या आणा-भाका, शपथा झाल्यात. त्यांनी काहीतरी वेगळंच प्लानिंग केलं. मग ठरल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक 9 मे रोजी दुपारी 4.00 वाजता त्यावर प्रत्यक्ष कृती झाली. आणि ती अचानकच गायब झाली. तिचं अपहरण झाल्याचीच चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात जे घडलं, ते वेगळंच होतं. वणी तालुक्यातील या घटनेनं खळबळच उडाली.

तक्रारीनुसार मजुरी करणाऱ्या बापाची ‘ती’ सर्वात मोठी मुलगी. वडलांना सांगून ती बाहेर खेळायला निघून गेली. मग काही वेळातच पाऊस आला. पाऊस थांबल्यावरही बराच काळ लोटला. तरीही ती परतली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला. मग त्यांना कळलं, की त्यांची मुलगी ऑटोरिक्षात बसून निघून गेली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की एक तर तिचं अपहरण झालं असावं किंवा ती पळून गेली असावी. सर्वत्र शोधाशोध झाल्यावर फिर्यादी बापानं पोलीस स्टेशन गाठलं. दुसऱ्या दिवशी एका नातेवाईकानं मुलगी दिसल्याची मोठी खबर दिली. ‘ती’ आरोपीच्या बहिणीकडे असल्याचं कळलं. त्यानंतर फिर्यादी त्या ठिकाणी काही नातेवाईकांसह पोहचलेत. तिथं त्यांना त्यांची मुलगी दिसली.

आम्ही तुला घेण्यासाठी आलो आहोत. तू आमच्या सोबत चल असं फिर्यादीनं आपल्या मुलीला म्हटलं. तेव्हा तिनं त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. याही पुढं जाऊन ती म्हणाली की, ती तिच्या प्रियकारसोबतच राहणार आहे. नेण्याची जबरदस्ती केल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी मुलीनं दिली. तेव्हा वडलांसह सगळेच घाबरलेत. आरोपीच्या वडलांनी त्यांना विश्वास दिला. ते म्हणालेत, की आम्ही त्या मुलीची समजूत घालून परत आणून सोडतो. परंतु 12 मे पर्यंतही तिला घरी परत आणून दिले नसल्याचं मुलीच्या बापाचं म्हणणं आहे. तक्रारीनंतर पोलीस यावर काय कृती करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.