नगरपरिषद शाळेचा विद्यार्थी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजचा प्राचार्य होतो

वणीचे सुपुत्र डॉ. शाम मुडे जगप्रसिद्ध फर्ग्यूसन कॉलेजच्या प्राचार्यपदी

निकेश जिलठे, वणी: नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं, की अनेक जण नाक मुरडतात. त्यांचं भविष्यात काहीच होणार नाही, अशी नकारात्मक भूमिका ठेवतात. मात्र प्रज्ञा आणि प्रतिभेच्या बळावर अशाच शाळांमधून शिकणारी मुलं आकाशावरही आपला झेंडा गाडतात. जिद्दीला जर अथक परिश्रमाची साथ मिळाली तर आकाशाला सहज गवसणी घालता येते. हेच वणीतील एका सर्वसामान्य कुटुंबातून येणा-या व शिक्षण क्षेत्रात कार्य करणा-या एका प्राध्यापकाने दाखवून दिले आहे. त्यांचा वणीतील शाळा क्रमांक 1 मधून सुरु झालेला हा प्रवास आता केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या फर्ग्यूसन कॉलेज पर्यंत पोहोचला आहे. वणीचे सुपुत्र डॉ. श्याम नारायण मुडे यांची पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाली आहे. ते याच महाविद्यालयात भूशास्त्र (Geology) विषयाचे प्रोफेसर व याच विभागाचे विभाग प्रमुख आहेत. वणीचा एक सुपुत्र पुण्याच्या नामांकीत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पोहचल्याने परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

असा आहे त्यांचा शैक्षणिक प्रवास
डॉ. शाम मुडे हे मुळचे वणीचे. त्यांचे वडील नारायण मुडे हे नायब तहसिलदार तर आई इंदूमती मुडे या गृहिणी. वणीतील जैन स्थानक समोर ते राहत होते. डॉ. शाम मुडे यांनी प्राथमिक शिक्षण नगर पालिकेच्या शाळा क्रमांक 1 मधून पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण वणीच्याच जनता विद्यालय येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 11 वी साठी लोकमान्य टिळक कनिष्ट महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. तिथून 12 वी केल्यानंतर त्यांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी भूशास्त्र हा विषय निवडला. याचे कारण म्हणजे त्यांना बालपणापासूनच जमीन, भूगर्भ याविषयी कुतूहल व आवड होती. त्यामुळे पुढचे सर्व शिक्षण याच क्षेत्रात करायचे, असा निर्धार त्यांनी केला. मात्र हा अभ्यासक्रम त्यावेळी विदर्भात केवळ मोजक्या ठिकाणी होता. त्यात नागपूर आणि बल्लारशाह हे ठिकाण जवळ होते. म्हणून त्यांनी पुढील शिक्षणासाठी बल्लारशाह निवडलं. त्यांनी 1999 मध्ये बल्लारपूरच्या  गुरुनानक महाविद्यालयात भूशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2001 मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी याच विद्यापिठातून डॉक्टरेट पूर्ण केले. दरम्यान ते सेटची परीक्षादेखील उत्तीर्ण झालेत.

सुरुवातीच्या काळात डॉ. शाम यांनी नागपूर विद्यापिठात नंतर कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज येथे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. सन 2006 मध्ये ते फर्ग्यूसन कॉलेजमध्ये असिस्टन्ट प्रोफेसर म्हणून रुजू झालेत. पुढे त्यांचा हा प्रवास असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर पदापर्यंत पोहोचला. त्यानंतर ते याच महाविद्यालयातील जिओलॉजी या विभागाचे विभाग प्रमुख झालेत. सध्या त्यांचा प्रवास याच कॉलेजमध्ये प्राचार्य पदापर्यंत पोहोचला आहे.

विद्यार्थ्यांनी वेगळी वाट निवडावी – डॉ. शाम मुडे
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयात शिक्षण घेतले तर त्यात त्यांना अधिक चांगले करता येऊ शकते. जरी ती वेगळी वाट असली तरी विद्यार्थ्यांनी ही वाट निवडावी. भूशास्त्रात विविध विषयांचा समावेश आहे. सध्या क्लायमेट चेंज हा केवळ देशासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. खनिज संपत्ती, जमीन, इत्यादीवर संशोधन झाल्यास त्याचा देशहितासाठी मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर जमीन, माती, भूगर्भ याबाबत कुतूहल, आवड असेल तर त्यांनी या विषयाकडे नक्की वळावे. कुठलेही क्षेत्र निवडले तरी जिद्द आणि परिश्रमाशिवाय यश मिळवता येत नाही.
 – डॉ. शाम मुडे, प्राचार्य फर्ग्यूसन कॉलेज, पुणे

डॉ. शाम यांनी भूशास्त्र विषयातील संशोधनाचे अर्धशतक गाठले आहे. त्यांचे आतापर्यंत 50 पेक्षा अधिक रिसर्च पेपर पब्लिश झाले आहेत. त्यांच्या संशोधनासाठी विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी परदेशी जात तैवान युनिवर्सिटीत देखील संशोधन सादर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात देशातील विविध भागातून आलेले विद्यार्थी भूविज्ञान विषयात आपले संशोधन पूर्ण करीत आहे.

डॉ. शाम यांच्या यशात आई-वडील, पत्नी, भाऊ-बहिण यांची मोलाची साथ लाभली. ते सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. पुढे कॉलेजचे सहकारी प्राध्यापक, मित्र यांनी देखील त्यांना कायम प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे यश गाठता आले, अशी कबुली डॉ. शाम यांनी दिली. वेगळी वाट निवडलेल्या डॉ. शाम यांचा हा प्रवास अनेक तरुण व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सन 1884 मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे इत्यादींनी स्थापना केली. या संस्थेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सांगली इत्यादी ठिकाणी कॉलेज आहेत. वि. दा. सावरकर, पु. ल. देशपांडे, पीव्ही नरसिंहराव, व्हीपी सिंग, सायरस पुनावाला, डॉ. श्रीराम लागू, इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे, सोनाली कुळकर्णी, राम गणेश गडकरी इत्यादी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.