बहुगुणी डेस्क, वणी: शासन दरबारी तक्रार करुन व त्याची मीडियातून बातमी प्रकाशित करून बळजबळी पैसे उकळण्या-या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक पत्रकार तर दुसरा एका पक्षाचा पदाधिकारी आहे. चिखलगाव येथील एका कंट्रोल दुकान चालकाची तक्रार करून याबाबत मीडियात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सदर तक्रार मागे घेण्यासाठी 2.5 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप करत दुकान चालकाने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दोघांविरोधात खंडणीचा व इतर गुन्हे दाखल केले आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी बंडू ज्ञानेश्वर देवाळकर (45) हे चिखलगाव येथील रहिवासी असून त्यांचे स्वस्त धान्याचे दुकान आहे. आरोपी रविंद्र उर्फ बबलू उत्तमराव मेश्राम (46) रा. सेवानगर वणी हा एका पक्षाचा पदाधिकारी आहे. तर महेश गंगाधर टिपले (52) रा. सिद्धार्थ वसतिगृहाजवळ हा एक न्यूज पोर्टलचा पत्रकार आहे. रविंद्र हा तक्रार करायचा तर टिपले त्याची बातमी आपल्या पोर्टलवर प्रकाशित करायचा. हे गेल्या 7 महिन्यांपासून देवाळकर यांच्या दुकानाबाबत तक्रार करून याची पोर्टल व पेपरमध्ये बातमी प्रकाशित करीत होते. दिनांक 11 मार्च रोजी या दोघांनी देवाळकर हे यांच्या दुकानात बोगस कार्ड वापरून दुकान चालवतात, अशी तक्रार उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.
एक महिन्यानंतर दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास महेश टिपले हा देवाळकर यांच्या घरी आला. त्याने देवाळकर यांना रविंद्र मेश्राम याने तुमच्याकडे पैसे आणण्यासाठी पाठवले, असा निरोप दिला. यावर कशाचे पैसे अशी विचारणा केली असता, महेश याने रविंद्र मेश्राम याला कॉल लावला व देवाळकर यांच्याशी बोलणे करून दिले. बोगस कार्ड वापरून तुम्ही रास्त धान्य दुकान चालवत असल्याची तक्रार केली आहे. सदर तक्रार मागे घेण्यासाठी 2.5 लाख रुपये द्या, अशी मागणी मेश्राम याने मोबाईल फोनवरून देवाळकर यांच्याकडे केली. त्यावर देवाळकर यांनी बोगस कार्ड वापरून दुकान चालवत असल्यास प्रशासकीय अधिकारी चौकशी करून कार्यवाही करेल. तुम्हाला एवढे पैसे देऊ शकत नाही. दुकान बंद झाले तरी चालेल, असे म्हणत त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
त्यावर टिपले याने तू वणीत भेट तुला पाहून घेतो. अशी धमकी दिली. यावेळी देवाळकर यांच्या घराशेजारील घटनास्थळी उपस्थित होते, असे तक्रारीत म्हटले आहे. टिपले तिथून निघून गेला. त्यानंतर 9 मे रोजी एका सुपरिचित वृत्तपत्रात व जनहित न्यूज नामक एका पोर्टलमध्ये देवाळकर चालवत असलेल्या दुकानाबाबत वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर वेळोवेळी टिपले व मेश्राम हे देवाळकर विरोधात वृत्तपत्र व पोर्टलमध्ये बातमी प्रकाशित करीत होते. सततच्या तक्रारी व वृत्त प्रकाशित झाल्याने त्रस्त होऊन मंगळवारी देवाळकर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 308 (2), 351 (2), 351 (3) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
निवेदन, तक्रारी झाला काहींचा धंदा ?
तक्रारी मांडण्याचे निवेदन हे एक प्रभावी माध्यम आहे. यासाठी अनेक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक निवेदन देतात. यातून न्याय मिळावा, समस्या सुटावी असा प्रामाणिक हेतू असतो. मात्र काही लोक वैयक्तिक आकस किंवा वेगळा उद्देश डोक्यात ठेऊन प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारीचा सपाटा लावतात. या तक्रारी करून मीडियात वृत्त प्रकाशित केले जाते. यातील अनेक निवेदन व तक्रारीचा वापर ‘अर्थ’पूर्ण कार्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तक्रारी, निवेदन हा एक धंदा तर बनला नाही, असा सवाल या प्रकाराने उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकारात लोकांचे प्रामाणिकपणे प्रश्न उपस्थित करणारे काही सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांची चांगलीच गोची होत आहे.
जुन्या लाच प्रकरणाची किनार?
सात महिन्याआधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात वणीतील तहसिल कार्यालयातील अन्न पुरवठा निरिक्षका विरोधात बंदू देवाळकर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी या विभागाने पुरवठा विभागाच्या निरीक्षकाला 70 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. याचा राग दोघांनी मनात धरून त्रास देणे सुरु केले होते. असा आरोप देखील तक्रारीतून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला जुन्या लाच प्रकरणाची किनार असल्याचा ऍन्गल देखील समोर आला आहे.



Comments are closed.