देशी दारू दुकान वाचविण्याकरिता देव दर्शनाचे प्रलोभन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथील परवाना धारक देशी दारु दुकान बंद करण्याकरिता गावातील संपूर्ण महिला सह प्रतिष्ठित पुरुष ही एक झाले असताना, दुसरीकडे दारूचे दुकान वाचवण्यासाठी विविध प्रलोभनं दाखवून अमाप पैसा खर्च करणं सुरू असल्याची माहिती आहे. यासाठी गावातीलच दलालांंना हाताशी धरणे सुरू असल्याने आता मांगलीत महिला व दारूबंदीचे कार्यकर्ते आणि दारू दुकानदार व राजकीय पदाधिकारी असा सामना रंगताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे यात एक ग्रामपंचायत पदाधिकारी व तंटे न सोडवता तंट्यात वाढ करणारा पदाधिकारी हेच दुकानदाराला मदत करीत असल्याचं समोर येत असल्याने गावातील दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 24 मार्चला मांगलीमध्ये उभ्या आणि आडव्या बाटलीसाठी मतदान होणार आहे.
सदर दारू दुकानदार याच दोन लोकांना हाताशी धरून व काही महिलांच्या नवऱ्यांना पकडून गावातील महिलांना पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शनाचं प्रलोभन दाखवलं जात असून महिलांना मतदानापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. २४ मार्च ला मतदान असल्यामुळे दारू दुकानदार वाटेल ते प्रयत्न करीत आहे.
गावातील प्रतिष्ठित नागरिक दारूबंदीसाठी गावात बैठकी घेणे, घरोघरी भेटी देणे, दारू दुकान बंद दुष्परिणाम, याबत प्रबोधन करीत आहे तर या प्रतिष्ठित नागरिकांच्या पत्नी सुद्धा गावातील महिलांच्या घरी जाऊन भेटी देत आहे. गावात ऍटोद्वारा लाऊडस्पीकर लाऊन दारूबंदी बाबत प्रचार सुरु आहे. सोबतच गाव दारुमुक्त करण्याकरिता रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मांगली गावात दोन कट्टर विरोध पार्टी असून दोन्ही पार्टीचे लोक दारू दुकान बंद करण्याकरिता एकत्र आले आहे.
तर दुसरीकडे दारू दुकान बंद होऊ नये म्हणून यवतमाळ येथील एका मंत्र्याने सुद्धा मांगली येथील आपल्या पार्टीच्या पदाधिकार्यांला मदत करा असे सांगितल्याची माहिती आहे. परन्तु संपूर्ण गाव एक झाल्यामुळे त्यांचाही इलाज चालला नाही व तोही पदाधिकारी दारू दुकान बंदसाठी गाकर्यासोबत उभा राहिला.
मांगली गावात ७११ महिलांचे मतदान असून १५० महिलांना ३ ट्रॅव्हल्स द्वारे देवदर्शनाच्या नावाने बाहेर वेऊन त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. परन्तु दारू दुकान बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही व अशा देव दर्शनाच्या प्रलोभनाला आम्ही बळी पडणार नाही अशाही काही महिला बोलत आहेत. आता प्रबोधन जिंकते की प्रलोभन हे २४ तारखेच्या मतदानानंतच कळेल.