बहुगुणी डेस्क, वणी: मुर्धोनी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत अनेक जुगारी पळून जाण्यात यशस्वी झालेत. मात्र 7 जुगारी पोलिसांच्या हाती आलेत. यात 6 जण मुर्धोनी तर एक व्यक्ती पळसोनी येथील आहे. शनिवारी दिनांक 14 जून रोजी संध्याकाळी साडे 6 वाजताच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली. आरोपींकडून व घटनास्थळावरून सुमारे 6 हजारांचा मुद्देमाल व पत्ते जप्त करण्यात आले आहे.
वणी पोलिसांना मुर्धोनी येथे गंजीफा हा पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती खबरीकडून मिळाली. त्यावरून वणी पोलिसांचे पथक संध्याकाळी सिव्हिल ड्रेसमध्ये मुर्धोनी येथे गेले. तिथे त्यांना निर्गुडा नदीच्या काठावरील एका चिंचेच्या झाडाखाली काही इसम एक्का बादशाह या खेळावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. खबरीने इशारा करताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. धाड पडताच या ठिकाणी एकच पळापळ झाली. जुगारी मिळेल त्या दिशेने वाट काढीत पळाले. मात्र 7 जुगारी पोलिसांच्या हाती लागले. सदर जुगारी हे मुर्धोनी व पळसोनी येथील आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून 4390 रुपये तर घटनास्थळावरून नगदी 1670 रुपये असे एकूण 6060 रुपये रोख व पत्ते जप्त केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सदर धाड डीबी पथकाचे धीरज गुल्हाने यांच्या नेतृत्त्वात टाकण्यात आली.
Comments are closed.