वणीतून तलाठ्याचे अपहरण करून मारहाण
विवेक तोटेवार, वणी: भूदान जमिनीचा ताबा दिल्यावरून शहरातील एका तलाठ्याचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
वणी तालुक्यातील मोहुर्ली येथे भूदान जमिनीवर एका महिलेचा ताबा आहे. ही जमीन तिने आरोपी तिरूपती गादावैनी उर्फ अण्णा (40) याला मक्त्याने दिली आहे. सदर जमीन भूदानाअंतर्गत शासनाने शेख जमिर शेख मेहबूब यांना दिली होती. तलाठी चैतन्यकुमार शिंगणे (47) हे मोहुर्ली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत व वणीतील प्रगती नगर परिसरात ते राहतात. बुधवारी शिंगणे हे मंडळ अधिकारी गुलाब कुमरे यांच्यासोबत सदर जमिनीच्या कामासाठी मोहुर्लीला गेले होते. तिथे त्यांनी शेख जमिर शेख मेहबूब यांना जमिनीचा ताबा दिला. त्यानंतर संध्याकाळी काम आटपून ते वणी शहरात परतले होते.
रात्री वणीतील वरोरा रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये शिंगणे आणि मंडळ अधिकारी गुलाब कुमरे जेवण करीत होते. दुसरीकडे जमिनीचा ताबा तलाठ्यांनी शेख जमिरला दिल्याची माहिती महिलेने अण्णाला दिली. शिंगणे आणि कुमरे जेवण करीत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये अण्णा त्याच्या साथीदारासह पोहोचला. त्याने शिंगणे यांना कानशिलात लगावली व त्यांना ओढत बाहेर आणले. त्यांनी शिंगणेंना एका स्कुटीवर बसवले व त्यांच्या मागे अण्णाचा एक साथीदार बसला. ते तिघे त्यांना घेऊन वणीतील एका लेआऊटमध्ये गेले. शेख जमीर शेख मेहबूब याला माझ्या जमिनीचा ताबा का दिला अशी विचारणा करत अण्णाने शिंगणेंना मारहाण करण्यास सुरूवात केली. पुन्हा जर माझ्या शेताचा ताबा देण्याकरीता आल्यास जिवे मारील अशी धमकीही त्याने दिली.
त्यानंतर तिथे एक पांढरी स्कॉर्पिओ आली. त्यामध्ये त्यांना बसवण्यात आले व त्यांना मोहुर्ली येथील संबंधीत शेतात नेण्यात आले. तिथे अण्णाने त्यांना शेतातील बंड्यावर ठेवले व तिथे त्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली.
हॉटेलमध्ये शिंगणे यांना मारहाण झाल्याने त्यांच्या सोबत असलेले मंडळ अधिकारी गुलाब कुमरे यांनी लगेच झालेल्या प्रकरणाची माहिती तहसिलदार रविंद्र जोगी यांना दिली. जोगी यांनी तात्काळ याची माहिती ठाणेदारांना दिली. त्यानंतर अण्णाचा शोध घेण्यास सुरूवात झाली. मोबाईलवरून त्यांचे लोकेशन हे घोन्सा रोडवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने गाडी नेताच त्यांना मोहुर्लीजवळील एका शेताजवळ पांढ-या रंगाची सफारी दिसली. त्याच्या बाजुला असलेल्या बंड्यात शोध घेतला असता त्यांना तिथे आरोपी शिंगणे यांना मारहाण करताना दिसले. पोलीस येताच चारही आरोपींनी तिथून पळ काढला. पोलिसांनी लगेच शिंगणे यांची सुटका केली व आरोपीला ताब्यात घेतले.
शिंगणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिरूपती उर्फ अण्णा गादावैनी (40) रा. मंगलम पार्क चिखलगाव, भीमराव कालवा (42) रा. माजरी जि चंद्रपूर, संदीप दोतावार (35) रा मंगलम पार्क चिखलगाव व एका विधिसंघर्ष बालक यांच्याविरूध्द भादंवी 363, 323, 504, 506, 34 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पोलीस कस्टडी मिळावी यासाठी गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव पडघन करीत आहे.