बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यापाड्यातील मुलं दर्जेदार शिक्षणासाठी शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी जातात. जाणं-येणं करण्यासाठी स्कूल बस असते. मात्र सोमवार दिनांक ३० जूनला सकाळी गावातला एकही विद्यार्थी आपल्या शालेत जाऊच शकला नाही. त्याचं कारण म्हणजे, त्यांना न्यायला येणारी स्कूल बसच मार्गावरील चिखलात फसली. त्यामुळे बराच काळ ट्राफीक जामचाही सामना करावा लागला. अखेर गावकरीच रस्त्यावर उतरलेत. टो करून स्कूल बस काढली. मात्र एवढ्या वेळात शाळेला पूर्ण उशीर झाला होता. ही सत्यकथा आहे मारेगाव तालुक्यातल्या डोर्ली या गावाची.
मारेगाव तालुक्यात चार किलोमीटर अंतरावर डोर्ली हे गाव आहे. गावात जाण्यासाठीचा दीड किमीचा रस्ता मुळीच चालण्याजोगा नाही. इतर वाहनांचा तर मग प्रश्नच उरत नाही. त्यामुळे नाइलाजानं गावात येण्या-जाण्यासाठी कालव्याच्या बाजूने जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून गावकऱ्यांनी शासकीय कार्यालयात कितीतरी चकरा मारल्यात. लोकप्रतिनिधी आ. संजय देरकर यांच्याकडेदेखील ही मागणी केली. हा रस्ता कधी दुरुस्त होतो, याची प्रतीक्षा गावकऱ्यांना लागली आहे.
हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित नाही. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली. शेतीला लागणाऱ्या खतं, बी बियाणे तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तुंसाठी बाहेरगावी जावंच लागतं. त्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज आहे. मात्र गत अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी झाली नाही. या रस्त्यावरून जाताना अनेकजण दुचाकीवरून पडून जखमी झालेत. संबंधित प्रशासनही कुठलेही लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी केवळ दिलासाच देणारी आश्वासनं देत बोळवण करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता गावकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी जात आहे. त्यांच्या प्रतीक्षेची सहनशक्ती संपत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



Comments are closed.