बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोनवेळा ही कारवाई करण्यात आली.
सोमवार दिनांक 30 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास भाजीबाजारातील शौचालयाजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. आरोपी 1 ते 10 आकड्यांच्या चिठ्ठया लिहून लोकांकडून पैसे घेत होते. तेव्हाच रजानगर येथील आरोपी अक्रम सय्यद गफ्फार (42) व मोमिनपुरा येथील आरोपी शेख मजीत शेख सत्तार (40) या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून नगदी 550 रूपये व आकडे लिहिलेल्या चिठ्ठया, तसेच वरळी मटका साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सहकलम 49 बीएनएस अन्वये गुन्हा नोंद केला.
ही झाली पहिली कारवाई. तर दुसरी कारवाई त्याच दिवशी, त्याच ठिकाणी म्हणजे सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान झाली. पोलिसांनी पुन्हा तिथंच धाड टाकली. यावेळी कोना येथील गणेश कवडू उपरे (26), सोमनाळा येथील शेख रज्जाक शेख वहाब (55), नायगाव येथील विठ्ठल गणपत हनुमंते (47), ब्राह्मणी येथील साधू आत्माराम राजगडे (56), मोमिनपुरा येथील अब्दुल हाफीज ऊर्फ टापू अब्दुल सत्तार (40) या आरोपींना मटका घेताना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून नगदी 5 हजार 390 रूपये, तसेच वरळी मटका साहित्य जप्त केले.
याप्रकरणी पोलिस शिपाई हरिभाऊ दळवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 12 (अ) मजुका सहकलम 49 बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुदाम आसोरे व त्यांच्या पथकाने केली.
—————————–
Comments are closed.