बहुगुणी डेस्क, वणी: साम, दाम, दंड आणि भेद ह्या चार नीती सर्वांनाच माहिती आहेत. पहिल्यांदा चुकलं तर सर्वात आधी त्या व्यक्तीला समजावून सांगतात. दुसऱ्यांदा त्याला काहीतरी प्रलोभन दिलं जातं. नंतरच दंड आणि भेद हे हत्यार वापरतात. मात्र याही पलीकडे जर कुणी काहीच सुधार करत नसेल, तर त्यावर काय करावं हा प्रश्नच पडतो. मग त्यावर पाचवी नीती वापरतात. वणी पोलिसांनीही हाच प्रयोग केला. सेवानगरातील अट्टल गुन्हेगार साहील कैलाश पुरी (20) याला सहा महिन्यांकरिता तडीपार करण्यात आल्याचं वणी पोलिसांनी कळवलं आहे.
साहील याच्यावर चोरी, जबरी चोरी तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न असे बरेच गुन्हे नोंद आहेत. त्याच्या वर्तनात कोणताही सुधार होत नव्हता. दिवसेंदिवस त्याची गुन्हे करण्याची प्रवृत्तीत वाढ होत होती. त्यामुळे त्यास वणीचे उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक फौजदारी प्रकरण क्र. 02/2025 कलम 56(1) (अ), (ब) महाराष्ट पोलीस अधिनियम, दिनांक23/06/2025 अन्वये सहा महिन्यांकरिता तडीपार आदेश पारीत झाला होता. तडीपारीत त्यास यवतमाळ जिल्हा तसेच वणी तालुक्यास लागून असलेल्या इतर जिल्ह्यांतील लगतचे तालूके जसे की वरोरा, भद्रावती, कोरपणा तालुक्यांच्या हद्दीच्या बाहेर जाण्याबाबत आदेश पारीत झाले होते.
त्याप्रमाणे तडीपारीत साहील कैलाश पुरी यास मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी आदेशाची एक प्रत तामील करण्यात आली. नंतर त्याला नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे त्याच्या नातेवाईकांकडे पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत सोडण्यात आले. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर. पो.उप नि. धीरज गुल्हने, पो.कॉ. मोनेश्वर, पो.कॉ. वसीम, पो.कॉ. कुडमेथे, पो.कॉ. मेश्राम, पो.कॉ. नंदकुमार यांनी पार पाडली.
Comments are closed.