वणीतील विविध गुरुजनांचा सन्मान, भाजप शहरचा उपक्रम

गुरुंचा आशीर्वाद जीवनाला दिशा देतो – ऍड. नीलेश चौधरी

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शहरातील गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संस्कृत पंडित स्वानंद पुंड, जैताई माता मंदिराचे सर्वेसर्वा माधव सरपटवार, प्रसिद्ध कीर्तनकार मुन्ना महाराज तुगनायत आणि योग शिक्षक महादेवराव खाडे यांचे घरी जाऊन गुरुपूजा करण्यात आली. तसेच, प्रसिद्ध तबला वादक स्वर्गीय आबासाहेब कुचनकार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

रवींद्र चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, तसेच आध्यात्मिक आघाडी यवतमाळ जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे शहर अध्यक्ष ऍड नीलेश माया महादेव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुंचा आशीर्वाद जीवनाला दिशा देतो – ऍड. नीलेश चौधरी
गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा पवित्र उत्सव आहे. गुरुंचा आशीर्वाद असल्यास जीवनाला खरी दिशा मिळते. वणी शहरात अनेक शिक्षक आणि गुरु आहेत, ज्यांनी असंख्य व्यक्तींना घडवले आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या या कार्याचा वणी आणि परिसराच्या सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक विकासात मोलाचा वाटा आहे. आम्ही अशा काही गुरुजनांचा सन्मान करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भाजपतर्फे गुरुवंदना हा उपक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त देशभर राबवण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वणीत हा उपक्रम भाजप शहर तर्फे राबवण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष डंभारे, साखरकर, बालाजी भेडोडकर, हितेन अटारा, मयूर गोयनका यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाने गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश समाजात पोहोचवला.

Comments are closed.