बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलिच्या भालर वसाहतीतील एका बंद क्वार्टरमध्ये चोरट्यांनी चोरी करून 230,000 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केला. ही घटना 10 जुलै 2025 रोजी रात्री 11:45 ते 11 जुलै सकाळी 8:00 या कालावधीत घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातील भालर वसाहतीतील क्वार्टर क्रमांक MQ 275 मध्ये ध्रुवदेव संपत राजभर (वय 53) राहतात. ते मूळचे हरिदासपूर, जि. गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथील असून, वेकोलिच्या निलजई 01 कोळसाखाणीत डंपर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते भालर वसाहतीत राहत आहेत. सध्या त्यांची पत्नी आणि मुलगा मूळगावी गेल्याने ते एकटेच क्वार्टरमध्ये राहत होते. 10 जुलै रोजी रात्री 11:45 वाजता रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी त्यांनी क्वार्टरला कुलूप लावले होते.
11 जुलै रोजी सकाळी परतल्यावर त्यांना क्वार्टरचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. कपाटाचे दार उघडे असल्याने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.चोरट्यांनी बंद क्वार्टरची संधी साधून कपाट फोडले आणि त्यातील 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत 80,000 रुपये), 2 ग्राम वजनाचे सोन्याचे डूल (किंमत 16,000 रुपये), 8 ग्राम वजनाचा सोन्याचा हार (किंमत 64,000 रुपये), 6 ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत 48,000 रुपये), 20 ग्राम वजनाची चांदीची चैन (किंमत 2,000 रुपये) आणि 20,000 रुपये रोख असा एकूण 230,000 रुपयांचा मुद्देमाल चोरला.
ध्रुवदेव राजभर यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम 305(a) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.



Comments are closed.