बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टर आणि रेती जप्त केली आहे. तसेच, ट्रॅक्टर चालकावर रेती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत 3,00,000 रुपये) आणि 1 ब्रास रेती (किंमत 6,000 रुपये), असा एकूण 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी पहाटे पावने तीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या API अश्विनी रायबोले आणि त्यांच्या पथकाला 2:40 AM वाजता जन्नत सेलिब्रेशन हॉलसमोर एक ट्रॅक्टर जाताना दिसला. ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यात रेती भरलेली आढळली. चालकाकडे परवाना विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. रेती चोरीची असल्याचा संशय बळावल्याने API रायबोले यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला.
या कारवाईत पोलिसांनी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत 3,00,000 रुपये) आणि 1 ब्रास रेती (किंमत 6,000 रुपये), असा एकूण 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. API अश्विनी रायबोले यांच्या तक्रारीवरून विशाल अशोक वैद्य (34), रा. वागदरा, ता. वणी, याच्यावर बीएनएस कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


Comments are closed.