बहुगुणी डेस्क वणी: शिवाजी गार्डन चौकात मोटारसायकलवर मोबाईलवर बोलणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावणाऱ्या तीन चोरट्यांना वणी पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी पोलिसांनी 18,000 रुपये किमतीचा विवो मोबाईल आणि 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल (MH 29 BL 0091) जप्त केली आहे, तसेच दोन अतिरिक्त मोबाईल फोनही हस्तगत केले आहेत. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांतच या मोबाईल चोरणा-या टोळीचा पर्दाफाश केला.
विकास पुरुषोत्तम ढेंगळे (42), रा. महादेव नगर, चिखलगाव, हे शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी शिवाजी गार्डन चौकात मोटारसायकलवर मोबाईलवर बोलत होते. दरम्यान तिथे 20 ते 25 वयोगटातील तीन चोरट्यांनी भरधाव मोटारसायकलवर येऊन त्यांचा 18,000 रुपये किमतीचा विवो मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. विकास यांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तपास सुरू केला. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाची मदत घेतली. दरम्यान मोटारसायकल (MH 29 BL 0091) च्या माहितीवरून पोलिसांनी मयूर गजानन बत्तुलवार (22), रा. शिवनेरी चौक, वणी, याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत, आपले साथीदार महेताब ईल्ताब शहा (24), रा. गोकूळ नगर, आणि प्रद्युम्न उर्फ बॉबी किशन कुरेकार (22), रा. साई मंदिर चौक, यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले.
नंबर प्लेटवर खोडतोड करून चोरी
चोरट्यांनी वापरलेल्या मोटारसायकलच्या (MH 29 B 0091) नंबर प्लेटवरील ‘B’ नंतरचे सर्व नंबर खोडलेले होते, अशी माहिती तक्रारदारांनी दिली होती. मात्र पोलिसांनी शिताफीने या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींची चौकशी केली असता, महेताब शहा याने आणखी दोन चोरीच्या घटना कबूल केल्या. पोलिसांनी त्याच्या घरातून 15,000 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि 15,000 रुपये किमतीचा रियलमी मोबाईल जप्त केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल आणि 18,000 रुपये किमतीचा विवो मोबाईल जप्त केला. नंबर खोडून चोरी करण्याची ही नवी शक्कल समोर आल्याने पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर, डी.बी. पथकातील पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलिस हवालदार अमोल दांडगे, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार आणि गजानन कुडमेथे यांनी पार पाडली.



Comments are closed.