धक्कादायक – सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

वरोरा-चिमूर रोडवर पहाटे अपघात, एक नि:स्वार्थी, सच्चा समाजसेवक काळाच्या पडद्याआड

बहुगुणी डेस्क, वणी: शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) यांचे वरोरा-चिमूर रोडवर अपघाती निधन झाले. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास परसोडा फाट्याजवळ हा अपघात झाला. ते चिमूर तालुक्यात पिकअप या मालवाहूने चालकासह जात होते. यावेळी एका ट्रकने मालवाहूला जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. ही वार्ता वणीत पोहोचताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वरो-याकडे धाव घेतली.

दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) रा. रविनगर वणी हे वणीतील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 8 यथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आज रविवारी पहाटे ते एक पिकअप किरायाने करून ते शेती पुरक व्यवसायासाठी माल आणण्यासाठी चिमूर तालुक्यात जात होते. मालवाहूत ते, चालक व क्लिनर असे तिघे जण होते. दरम्यान आनंदवन व चिमूर रोडवर आनंदवन पासून 2 ते 3 किमी अंतरावर असलेल्या परसोडा फाट्याजवळ एका ट्रकने ते जात असलेल्या मालवाहूला जबर धडक दिली. धडक पॅसेंजर साईडला असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. तर चालक व सोबत असलेली व्यक्ती जखमी झाली.

त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वणीत सकाळी ही वार्ता वा-यासारखी पसरली. ही वार्ता कळताच अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वरोरा येथे धाव घेतली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एक सेवाभावी व्यक्ती पडद्याआड !
दिलीप कोरपेनवार हे ‘कोरपेनवार सर’ या नावाने वणीत सुपरिचित होते. एक नि:स्वार्थी सेवाभावी आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. ते नगर सेवा समितीचे अध्यक्ष होते. वणी व परिसरात हजारो झाडे त्यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आली. तसेच अनेक गोरगरीब मुलांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले होते. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. वणी बहुगुणी कडून कोरपेनवार सरांना भावपूर्ण आदरांजली. 

  (सदर बातमी प्राथमिक माहितीवर आधारित असून अधिक माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)

Comments are closed.