रेल्वे क्रॉसिंगजवळील वाहतूक खड्डे आणि चिखलाने कोलमडली

अंकुश बोढे यांनी सहका-यांसह गाठले रेल्वेक्रॉसिंग... रोडसाठी अल्टिमेटम

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहराच्या वेशीवर असलेल्या चिखलगाव आणि वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे उड्डाणपुलांच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच येथे असलेल्या चिखलामुळे वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी त्रस्त आहेत. मनसेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांनी महाराष्ट्र सैनिकांसह रेल्वेक्रॉसिंगजवळ धडक दिली. तिथे त्यांनी चालकांशी संवाद साधला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत येथे तातडीने सर्विस रोड तयार करण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास “मनसे स्टाईल” तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अंकुश बोढे यांनी दिला.

दुपारी दीड वाजता अंकुश बोढे हे सहका-यांना सोबत घेऊन उड्डाणपुलाच्या ठिकाणी धडकले. तिथे त्यांनी दुचाकीस्वार व वाहतूक करणा-यांशी संवाद साधला. वाहतूकदारांनी उन्हाळा असला तर धुळीचा तर पावसाळ्यात खड्डे आणि चिखलाचा सामना करावा लागतो. तसेच अनेकांचे अपघात झाले अशी आपबिती सांगितली. तसेच रुग्णवाहिका चालकाने बाहेरगावी रेफर होणा-या रुग्णांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो अशी समस्या बोलून दाखवली.

अपघाताला कंपनी जबाबदार – अंकुश बोढे
कंपनीने रस्त्याच्या कामासाठी येथे मोठे खड्डे खोदले आले. सध्या पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे, तर येथे असलेल्या प्रचंड धुळीमुळे संपूर्ण मार्ग चिखलात माखला आहे. या खड्डेयुक्त आणि चिखलमय रस्त्यांमुळे अनेकदा दुचाकींचे अपघात झाले आहेत, ज्यात महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेकजण जखमी झाले आहेत. याला कंपनी जबाबदार असून कंपनीचे हे मुजोर धोरण खपवले जाणार नाही. येत्या आठ दिवसात जर कंपनीने योग्य ती कार्यवाही केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. – अंकुश बोढे, शहर अध्यक्ष मनसे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तहसिलदारांना निवेदन सादर

वणी जंक्शन येथून मोठ्या प्रमाणात रेल्वेची प्रवासी आणि मालवाहतूक होते. चिखलगाव आणि वरोरा रोड येथे रेल्वे क्रॉसिंग आहे. रेल्वे फाटक वारंवार बंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम मंजूर झाले आहे. नागपूर येथील सीएस कंस्ट्रक्शन इंडिया प्रा. लि. या कंपनीला दोन्ही उड्डाणपुलांचे कंत्राट मिळाले आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरु आहे. मात्र सर्विस रोड तयार न करताच कंपनीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे वाहतूक सातत्याने कोलमडते.

यावेळी मनसेचे मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, वैभव पुराणकर, योगेश ताडम, अहमद रंगरेज, सूरज तडस, कृष्णा निमसटकर, कृष्णा कुकडेजा, रितिक मोहुर्ले, आकाश घुमे, प्रेम आत्राम, दर्शन दाभेकर, राजकुमार रोगे, जुबेर खान, शाहुल आसमवार, हनी बत्रा इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed.