बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआऊट येथे चोरट्यांनी एका घरी घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी 75 हजारांची रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी ही घरफोडी उघडकीस आली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच चोरट्यांनी हे घर फोडले होते. त्या घरफोडीचा अद्याप छडा लागलेले नाही. त्याआधीच चोरट्यांनी पुन्हा याच घरी घरफोडी केली आहे. एकच घर दुस-यांदा लक्ष्य होत असल्याने वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोबिन शेख (48) हे पद्मावती नगरी, काळे ले आऊट येथील रहिवासी आहे. त्यांचे गॅरेज आहे. ते कुटुंबासह एका लग्नसमारंभासाठी तेलंगणा येथे गेले होते. आज मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी सकाळी ते घऱी परतले. मात्र त्यांना घराच्या दरवाज्याचा कोंडा तुटलेला आढळला. त्यांनी घरात प्रवेश करताच त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त आढळले. त्यांनी आलमारी चेक केली असता त्यांनी घरातील 75 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.
त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरी येऊन घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात 2 जून रोजी चोरट्यांनी मोबिन शेख यांचे घर फोडले होते. यात दागदागिने व रोख रक्कम असा सुमारे 3 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.
प्रकरणाचा छडा का लागत नाही?
शहरात सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. मात्र शहरात सीसीटीव्ही असूनही किंवा तांत्रिक तपास करूनही पोलिसांना प्रकरणाचा छडा लावता आलेला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरगावातील चोरटे हे वणीत येऊन घरफोडी करतात. त्यांची ओळख स्पष्ट नसल्याने खबरीकडून त्यांचा शोध लागत नाही. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून चोरटे मोबाईलचा वापर करत नाही. त्यामुळे तांत्रिक तपास फायदेशीर ठरत नाही. घर सोडताना नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. सध्या तरी बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान व रोख रक्कम ठेवू नये, हाच उपाय वणीकरांसमोर उरलेला आहे.



Comments are closed.