वणीतील अधिकाधिक महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था
शिवसेनेकडून सौंदर्यीकरण व अतिक्रमण हटवण्याची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था झाली असून, सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते साकेत अविनाश भुजबलराव यांनी केली. त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी वणी आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं. नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि रविंद्रनाथ टागोर यांचे पुतळे इतिहासाचे आणि वैचारिक समृद्धीचे प्रतीक आहेत. मात्र, हे पुतळे तुटलेल्या चबुतऱ्यांमध्ये, मोडकळीस आलेल्या कठड्यांमध्ये आणि बॅनरांनी वेढलेल्या अवस्थेत आहेत. गांधी चौकातील पुतळ्याभोवती जाहिरात बॅनर अडकवलेले दिसतात.
साकेत भुजबलराव यांनी सांगितले की, 2013 नंतर नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे नव्या पिढीला चुकीचा संदेश जात आहे. ज्यांनी देशासाठी जीवनदान दिले, त्यांच्याच पुतळ्यांची ही दुर्दशा लज्जास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले. मागण्यांमध्ये सर्व पुतळ्यांच्या परिसरातील अतिक्रमण आणि बॅनर काढणे, चबुतरे-कठडे दुरुस्ती, नियमित स्वच्छता मोहीम आणि कायमस्वरूपी देखभाल यंत्रणा उभारणे यांचा समावेश आहे. येत्या 7 दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना युवासेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनासोबत पुतळ्यांचे फोटो, अतिक्रमण आणि अस्वच्छतेचे पुरावे सादर करण्यात आले. या वेळी अजय चन्ने, विलास भट, सुजल तिवारी, सुनील खडतकर, सागर सोनेकर, अनिकेत टिकले, अंकुश रावत, अरिहंत, आकाश खंडाळकर आणि शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



Comments are closed.