आठवडी बाजार भरतोय घरासमोर, परिसरातील नागरिकांना त्रास

वारंवार तक्रार करुनही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील जत्रा मैदान परिसरात आठवडी बाजार भरतो. या बाजाराला नियोजित जागा आहे. मात्र हा बाजार आता थेट रामपुरा वार्ड येथील घरांसमोर पोहोचला आहे. मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. या बाबत उबाठा तर्फे दोनदा निवेदन देण्यात आले. पालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करणार असे आश्वासनही दिले. मात्र त्यावर कोणताही कार्यवाही न झाल्याने रामपुरा वार्डातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वणीतील जत्रा मैदानातील आठवडी बाजाराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या आठवडी बाजारात परिसरातील गावातून व्यापारी येतात. मात्र यातील काही व्यापारी, दुकानदार हे नियोजित जत्रा मैदानातील जागेवर दुकान न थाटता आता रामपुरा वार्डातील रत्यावर दुकानं थाटत आहे. रस्त्याच्या कडेला घरं आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जत्रा रोड हा रस्ता वरदळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गाचा लालगुडा, वागदरा, भालर, शिरपूर इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी वापर होतो. रस्त्यावर दुकानं असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शासकीय व खाजगी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आदींना मार्गक्रमण करताना अडथळे येत आहे. शिवाय लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दोन आठवड्याआधी या प्रकरणी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. त्याआधीही एकदा पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाला पालिका केराची टोपली दाखवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून रस्त्यावरच बाजार भरत असल्याने रामपुरा येथील रहिवासी संतप्त झाले आहेत. जर पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास या ठिकाणी उपोषण किंवा रास्ता रोको केले जाईल असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाने व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Comments are closed.