बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश खुशाल बेसरकर (वय 56) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झाले. उमेश बेसरकर यांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मारेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. ते पुसद येथून बदली होऊन मारेगाव येथे आले होते. एक मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.
आज, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत वेदना सुरु झाल्या. त्यामुळे त्यांना मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच पोलीस विभागात व मारेगाववासींना जबर धक्का बसला आहे.
बेसरकर यांनी पुसद येथे गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. तर मारेगाव येथे देखील ते समाधानपूर्वक कर्तव्य बजावत होते. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनात वणी येथील प्रेमनगर मध्ये रेड टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Comments are closed.