ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील बुरांडा हेटी येथे आज रविवार, दुपारी 1:30 वाजता राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मुकेश ज्ञानेश्वर आडे (वय 27, रा. बुरांडा हेटी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश आडे हे करंजी येथून आपले काम आटोपून दुचाकीवरून गावी परतत होते. गावाजवळील राज्य महामार्गावर एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुकेशच्या डोक्याला जबर मार लागला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मुकेशला मारेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या दुर्घटनेमुळे आडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुकेश यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि केवळ चार महिन्यांचा लहान मुलगा असा आप्त परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेने गावकरी आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. अपघातस्थळी मोठी गर्दी जमली असून, स्थानिकांनी ट्रकचालकाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Comments are closed.