14 सप्टेंबरला वणीत महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान शिबिर

महिला डॉक्टर करणार महिलांमध्ये असलेल्या कॅन्सरची तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी:वणीत रविवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नागपूरमधील तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या चमूमार्फत महिलांशी संबंधित आजारांची निःशुल्क तपासणी आणि निदान करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात मुख्यत: स्तन कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, गर्भाशयमुखाचा कॅन्सर (Cervical Cancer), थॉयरॉईड कॅन्सर इत्यादी महिलांमध्ये असलेल्या आजारांचे तपासणी करून निदान केले जाणार आहे. लायन्स क्लब वणी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, नार्ची-नागपूर चॅप्टर-मेनोपॉज सोसायटी, नागपूर आणि असोशिएशन ऑफ सर्जन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरात डॉ. निर्मला वझे, डॉ. विद्या सुतवणे, डॉ. पारुल सावजी, डॉ. नेहा मल्लावार, डॉ. प्राची उईके, डॉ. नूतन आंबेकर, डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. नीलम पुनियानी, डॉ. उज्वला देशमुख, डॉ. भावना पांडा इत्यादी तज्ज्ञ रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहे. नोंदणी सकाळी 8:30 वाजेपासून कार्यक्रम स्थळी सुरू होईल. तर तपासणी सकाळी 10:00 वाजेपासून दुपारी 3:00 वाजेपर्यंत चालणार आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी मो. 9049851616 व 7378576008 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

स्तनात गाठ असल्यास सावधान !
महिलांना होणारा सर्वात गंभीर आजार म्हणजे स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) आहे. महिलांना हा रोग असल्याचे कळत नसल्याने कॅन्सर वाढत जातो. जेव्हा कळते तेव्हा खूप उशिर झाला असतो. ब्रेस्ट कॅन्सर वाढत जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे महिलाच्या मनात याबाबत असलेली लज्जा. अनेक महिला याबाबत कुणाशी बोलायला टाळतात किंवा डॉक्टरकडे जाण्यास टाळतात. त्यामुळे हा रोग अधिकाधिक वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे बोलले जाते की अधिकाधिक महिला या आयुष्यभर स्तन कॅन्सरला सोबत घेऊन जगतात. स्तन कॅन्सरचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्तनात न दुखणारी गाठ तयार होणे. याशिवाय स्तनाग्रातून रक्तस्राव होणे, काखेत गाठ येणे, स्तनावर जखम होणे, स्तनाच्या त्वचेत बदल होणे इत्यादी एकही लक्षण असल्यास स्तन कॅन्सरचा धोका असू शकतो. यातील काही लक्षणं असल्यास शिबिराला नक्की भेट देऊन स्तन कॅन्सरचे निदान करून द्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्तन कॅन्सरसह महिलांमध्ये गर्भाशय कॅन्सर, गर्भाशयमुखाचा कॅन्सर (Cervical Cancer), थॉयरॉईड कॅन्सर इत्यादी कॅन्सरचा धोका असतो. याशिवाय जे पुरुषांमध्ये कॅन्सर असतात ते देखील महिलांमध्ये असू शकते. सदर शिबिर हे विशेषत: महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून महिला डॉक्टरच रुग्णांची तपासणी करीत असल्याने वणी व ग्रामीण भागातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार नरेंद्र नगरवाला, सचिव लायन प्रा. डॉ. अभिजित अणे, प्रोजेक्ट मॅनेजर मंजिरी दामले यांनी केले आहे.

Comments are closed.