‘जय जय रामकृष्ण हरी’ राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र: ईश्वरदास बिरकुरवार
वणी:- गुजरात पासून पूर्ण उत्तरेत जय श्रीकृष्ण चा जप केला जातो. दक्षिणेत राम नामाचा जप केला जातो. महाराष्ट्र व कर्नाटकात हरि, हरि विठ्ठलाचा जप केला जातो. 500 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी सांप्रदायाला दिलेल्या जय जय रामकृष्ण हरि हा बीज मंत्र राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार ईश्वरदास बिरकुरवार यांनी केले. ते येथील रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमा अंतर्गत ‘धन्य धन्य ज्ञानेश्वरा’ या संगीतमय प्रवचनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
येथील प्रसिद्ध रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त या वर्षीपासून या मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारवा येथील प्रवचनकार ईश्वरदास बिरकुरवार यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनात त्यांनी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगून ज्ञानेश्वर माउलींनी आपल्यावर करून ठेवलेल्या उपकाराची जाणीव करून दिली.
या प्रवचनात संवादिनीची साथ पुंडलिक पेटकुळे यांनी तबल्याची साथ सतीश गाऊत्रे यांनी गायकीची साथ दत्ता मोहूर्ले, संतोष येलपुलवार, यांनी दिली. या संचासोबत भगवान प्रधान, नारायण वाटगुरे, किशोर पंडीत याचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संचालन मनोहर वरारकर यांनी केले. आभार सतीश बाविस्कर यांनी मानले.या कार्यक्रमात या मंदिर समितीचे अध्यक्ष मुन्नालाल तुगनायत, सुनील येमुलवार, इत्यादि अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.