नायक सूरज वागदरकरचा भूतान मॅरेथॉनमधील यशाबाबत सन्मान
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली
पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील काळाराम मंदिर परिसरातील रहिवासी नायक सूरज सुधाकर वागदरकर सध्या लष्करी सेवेत भूतान येथे कार्यरत आहे. नुकत्याच भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. सुट्टीवर वणी येथे आल्यानंतर सहजयोग ध्यान केंद्रातर्फे त्याचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सूरजने 11 जून 2018 रोजी भारतीय लष्करात प्रवेश केला. प्रशिक्षण पूर्ण करून विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर नायक पदावर बढती मिळाली. त्यानंतर भारत-भूतान करारानुसार त्याला भूतान येथे सैन्य प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले. याच दरम्यान भूतानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत 15 देशांतील 3,000 स्पर्धकांमधून सूरजने तिसरा क्रमांक मिळवला.
कठोर परिश्रमाने सूरज यांनी लष्करात सामील होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतही यश मिळवले. गणेशपूर येथील सहजयोग ध्यान केंद्रात आयोजित सत्कार समारंभात सूरजला गौरवण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय तो सहजयोग, प्रशिक्षक त्योगेंद्र शेंडे आणि आई-वडिलांना देतो.


Comments are closed.