बहुगुणी डेस्क, वणी: शेतात पाईपलाईन टाकण्याच्या वादातून दोन शेतक-यात हाणामारी झाली. एकाने हातातील टणक वस्तूने तर दुस-याने हातातील काठीने हल्ला केला. यात दोघेही जखमी झाला आहेत. झरी तालुक्यातील लिंगटी शिवारात शुक्रवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही शेतक-यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. दोन्ही शेतक-यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बह्मानंद यांच्या तक्रारीनुसार, ब्रह्मानंद शिवन्नारेड्डी येल्टीवार (50) हे लिंगटी येथील रहिवासी असून ते शेतकरी आहे. त्यांची परिसरात (लिंगटी-येवती शिवार) शेती आहे. तर आरोपी संतोष राघवरेड्डी बद्दमवार (40) हे देखील लिंगटी येथील रहिवासी असून त्यांची देखील बह्मानंदच्या शेतीलगत शेती आहे. संतोष याने लिंगटी येथील नाल्यावरून पाईपलाईन टाकून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केली. या कामासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र खोदकामामुळे रस्त्यात खड्डा तयार झाला होता. या खड्यात पाणी साचत असल्याने या परिसरातील शेतक-यांना शेतात जाण्यासाठी त्रास व्हायचा.
बह्मानंद व इतर शेतक-यांनी संतोष याला खड्डा बुजवण्याबाबत वारंवार सूचना केली. मात्र त्यांनी खड्डा बुजवला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी याची तक्रार ग्राम सचिवांकडे केली. दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ब्रम्हानंदरेड्डी शेतात जात होता. दरम्यान तिथे संतोष आला व त्याने खड्डा बुजवतो असे सांगितल्यावरही सचिवांकडे तक्रार का केली असा जाब विचारला. त्यानंतर संतोषने हातातील टणक वस्तूने ब्रह्मानंदवर हल्ला चढवला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात ब्रम्हानंदरेड्डी जखमी झाले.
ब्रह्मानंद यांनी पाटण पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आऱोपी संतोष विरोधात बीएनएसच्या कलम 118 (2), 351 (2), 352 नुसार गुन्हा दाखल केला.
संतोष यांच्या तक्रारीनुसार, बह्मानंद यांनी तक्रार केल्यानंतर सचिवांनी संतोषला खड्डा बुजवण्याबाबत विचारणा केली. संतोष यांनी खड्डा बुजवल्याची माहिती सचिवांना दिली. घटनेच्या दिवशी ब्रह्मानंद व संतोषची शेताजवळ भेट झाली. संतोषने ब्रह्मानंद यांना खड्डा बुजवल्यावरही सचिवांकडे तक्रार का केली अशी विचारणा केली. त्यावर ब्रह्मानंद याने हातातील काठीने संतोष यांच्यावर हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी दिली. यात त्यांना मुका मार लागला असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी ब्रह्मानंद विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1) व 351 नुसार गुन्हा दाखल केला आहे.



Comments are closed.