संजय खाडे यांच्यावर पक्षाने टाकली नवी मोठी जबाबदारी

कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्षांनी केली 'या' पदासाठी नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या कामाचा धडाका लक्षात घेत पक्षाने त्यांना आणखी एक नवी मोठी जबाबदारी सोपवली आहे. नुकतीच त्यांची अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच पक्षाने त्यांना प्रदेश सचिवपदाची जबाबदारी दिली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन,” अशी प्रतिक्रिया संजय खाडे यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.

संजय खाडे हे परिसरात कामगार आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर विविध आंदोलन आणि मोर्चे काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अचलपूर मतदारसंघात ते ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, युवक आणि महिला मतदारांशी संपर्क वाढवून पक्षाची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

अचलपूर मतदारसंघाची पार्श्वभूमी
अचलपूर मतदारसंघ हा सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र त्यानंतर येथे भाकप, भाजप व अलिकडच्या काळात प्रहार जनजशक्ती पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. बच्चू कडू या मतदारसंघातून सलग चार टर्म निवडून आले होते. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. प्रवीण तायडे या मतदारसंघातून सुमारे 12 हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात तिस-या क्रमांकावर होते. मात्र विजयी उमेदवाराची मार्जिन ही केवळ 15 हजारांची होती. त्यामुळे हे 15 हजार मतदार कव्हर करण्याची व या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची मोठी जबाबदारी संजय खाडे त्यांच्यावर राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पूर्ण ताकदीने काम करणार – संजय खाडे
पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम करणार आहे. शेतकरी, कामगार, युवक सर्वसामान्य मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि पक्षाची ताकद वाढवणे हा माझा पहिला उद्देश असेल. पक्षाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी आणि काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी मी आणि माझी टीम संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांचा विश्वास जिंकून पक्षाला विजय मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे. – संजय खाडे, प्रभारी अचलपूर मतदारसंघ

Comments are closed.