डेंग्यूवर युद्धपातळीवर मोहीम – नगर परिषदेतर्फे सर्वेक्षण सुरू

घराघरांत डास अळ्यांचे सर्वेक्षण व निर्मूलन, नागरिकांना आरोग्य शिक्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या विषाणुजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषद वणी आणि आरोग्य विभागाने जुलैपासून व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी मा. विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. तन्वीर शेख (जिल्हा हिवताप अधिकारी), डॉ. सचिन गाडे (मुख्याधिकारी, नगर परिषद वणी) व डॉ. समीर थेरे (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सर्व वार्डांमध्ये युद्धपातळीवर राबविली जात आहे.

एडिस इजिप्टाय प्रजातीच्या मादी डासांच्या चाव्यामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. त्यांची उत्पत्ती घरगुती व परिसरातील साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे वस्तीसेविका (Breeding Checker), आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन डास अळ्यांचे सर्वेक्षण, टेमिफॉस टाकून अळ्यांचे निर्मूलन तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण देत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रत्येक वस्तीसेविका दररोज 45-50 घरांना भेट देत असून 10 दिवसांच्या चक्रात सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाते. भांडी, ड्रम, कुलर, कुंड्या, टाकाऊ टायर्स आणि प्लास्टिक वस्तूंमध्ये अळ्या आढळल्यास त्वरित उपाययोजना केली जाते. ही मोहीम ऑक्टोबर 2025 पर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे.

आरोग्याची काळजी घ्या
नागरिकांनी स्वतःच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाणी साठवणारी भांडी स्वच्छ ठेवणे आणि प्रशासनाशी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. या मोहिमेमुळे वणी शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या नक्कीच घटेल – डॉ. सचिन गाडे, मुख्याधिकारी

या उपक्रमात उपमुख्याधिकारी जयंता सोनटक्के, अभियान व्यवस्थापक ऍड. पौर्णिमा शिरभाते, तालुका आरोग्य पर्यवेक्षक नरेश मेश्राम, हेमंत दुधे आणि विजय पेंदोरकर यांचे विशेष योगदान आहे.

Comments are closed.